दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने) :-
धाराशिव-तुळजापूर-सोलापूर या बहुप्रतीक्षित रेल्वे मार्गाच्या उभारणीला आता मोठा वेग आला आहे. प्रकल्पातील तुळजापूर-धाराशिव या ३०.७० किलोमीटरच्या टप्प्याचे ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे धाराशिव आणि तुळजापूर परिसरातील नागरिकांसह भाविकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. दरम्यान, सोलापूर-तुळजापूर या टप्प्याची निविदा प्रक्रिया ऑगस्टमध्ये सुरू होऊन हा टप्पाही डिसेंबर २०२९ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
एकूण ८४.२८ किलोमीटर लांबीच्या या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पामुळे सोलापूर, तुळजापूर आणि धाराशिव ही तीन महत्त्वाची शहरे प्रथमच थेट रेल्वेमार्गाने जोडली जाणार आहेत. विशेष म्हणजे राज्याचे प्रमुख शक्तिपीठ असलेल्या तुळजापूर येथे येणाऱ्या लाखो भाविकांसाठी हा मार्ग मोठा दिलासादायक ठरणार आहे. तुळजापूर ते धाराशिव या ३०.७० किलोमीटरच्या दुसऱ्या टप्प्याचे काम वेगाने सुरू असून, आत्तापर्यंत ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. या मार्गावर तुळजापूर, वडगाव आणि सांजा ही तीन नवीन स्थानके उभारली जात आहेत, तर धाराशिव हे विद्यमान स्थानक राहणार आहे. या टप्प्यात बोगद्याची आवश्यकता नसली तरी आठ मोठे पूल, नऊ छोटे पूल, १२ रोड अंडरब्रिज, आठ रोड ओव्हरब्रिज आणि १० मर्यादित उंचीचे सबवे उभारले जात आहेत. सुमारे ५३१.५७ कोटी रुपयांच्या या कामास २ सप्टेंबर २०२४ रोजी प्रारंभ झाला असून, जून २०२७ पर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे. हा रेल्वेमार्ग पूर्ण झाल्यानंतर सोलापूर, तुळजापूर आणि धाराशिव या भागांतील प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे. तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांची सोय होण्याबरोबरच परिसरातील व्यापार, उद्योग, शेतमालाची वाहतूक आणि रोजगारनिर्मितीलाही मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. तुळजापूर-धाराशिव टप्प्याने गाठलेली ८५ टक्के प्रगती पाहता हा भाग नियोजित वेळेत पूर्ण होण्याची शक्यता बळावली आहे. आता सोलापूर-तुळजापूर टप्प्याच्या निविदा प्रक्रियेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
तत्कालीन ठाकरे सरकारने राज्य हिश्श्याचा ५० टक्के वाटा न दिल्यामुळेच धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गाचे काम अडीच वर्षे रखडले होते. त्यामुळे प्रकल्प किंमतीतही तब्बल ११७.४९ टक्के वाढ झाली. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ९०४.९२ कोटी रूपयांच्या मूळ प्रकल्प किंमत असलेल्या धाराशिव-तुळजापूर-सोलापूर या रेल्वेमार्गासाठी आता तब्बल ३,२९५ कोटी रूपये लागणार आहेत. त्याचवेळी ठाकरे सरकारने हे पैसे उपलबध करून दिले असते तर रेल्वेमार्ग कदाचित आतापर्यंत पूर्णही झाला असता. महायुती सरकारने मूळ प्रकल्प किमतीनुसार ४५० कोटी रुपयांचा राज्य हिश्श्याचा वाटा दिलेला आहे. आता वाढीव २००० कोटींपैकी १००० कोटींचा राज्य वाटा देण्यासही राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. ठाकरे सरकारमुळे रखडलेल्या रेल्वेमार्गाला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमुळे गती मिळाली आहे. या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी रेल्वे प्रशासनासोबत आपला सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.
सोलापूर-तुळजापूर टप्प्यात पाच नवी स्थानके
सोलापूर ते तुळजापूरदरम्यान प्रकल्पाच्या महत्वाच्या टप्प्यात ५३.५८६ किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग उभारण्यात येणार आहे. या मार्गावर सोलापूर हे विद्यमान स्थानक राहणार असून खेड, मर्डी, तमलवाडी, माळुंब्रा आणि रायखेल अशी पाच नवीन रेल्वेस्थानके उभारली जाणार आहेत. या टप्प्यात १ हजार ३४० मीटर लांबीचे अर्थात एक किलोमीटरपेक्षा अधिक अंतराचे दोन बोगदे, आठ मोठे पूल, ३७ छोटे पूल, ३६ रोड अंडरब्रिज, सात रोड ओव्हरब्रिज तसेच २० मर्यादित उंचीचे सबवे उभारण्यात येणार आहेत. सुमारे एक हजार कोटी रुपयांच्या या कामाची निविदा प्रक्रिया ऑगस्ट २०२६ मध्ये सुरू होणार असून, डिसेंबर २०२९ पर्यंत हा टप्पा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.
