




दर्पण न्यूज पलूस/भिलवडी : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील संग्रामदादा प्रेरणा प्रतिष्ठानतर्फे आयोजित होड्यांच्या शर्यतीमध्ये कसबे डिग्रज बोट क्लबने प्रथम क्रमांक पटकावला. अत्यंत उत्साहात शर्यती भरवण्यात आल्या होत्या.
शर्यतीत कसबे डिग्रज बोट क्लबने प्रथम क्रमांक पटकावला. तरुण मराठा बोट क्लबने दुसरा, युवा शक्ती बोट क्लब कवठेसार तृतीय तर मोरया बोट क्लब सुखवाडी यांनी चौथा क्रमांक मिळविला. विजेत्यांना अनुक्रमे २१ हजार, १५ हजार, १० हजार व ५ हजारांचे बक्षीस देण्यात आले. एकूण सात बोटींचा यात सहभाग होता. खेळाडूंनी जिद्द आणि साहसी वृत्तीचे दर्शन घडविले. सहभागी बोटींना मानधन देण्यात आले. शर्यत पाहण्यासाठी ऐतिहासिक कृष्णा नदीघाट ग्रामस्थांनी मोठी गर्दी झाली होती. कृष्णा नदीपुलावरही बघ्यांची गर्दी होती. यावेळी कसबे डिग्रज आणि तरुण मराठा बोट क्लब यांच्यात चुरस पाहायला मिळाली.
यावेळी पलूस तालुका काँग्रेसचे नेते महेंद्र लाड, साहाय्यक पोलिस निरीक्षक किरण दिडवाघ, भिलवडीचे नेते राजूदादा पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रतीक पाटील, माजी उपसरपंच व युवक नेते पृथ्वीराज पाटील, उद्योजक गिरीश चितळे, माजी सरपंच शहाजी गुरव, माजी उपसरपंच चंद्रकांत पाटील, सुखवाडी सरपंच बाळासाहेब यादव, महेश जगताप, भिलवडी गावच्या सरपंच स्वप्नाली रांजणे, पंचायत समिती सदस्या सलामत, पंचायत समिती सदस्या हजारे, अंकलखोप जिल्हा परिषद सदस्य गडदे, पलूसचे उपसभापती वैभव उगळे , पत्रकार बांधव आदी मान्यवर व ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
प्रथम वळण घेणाऱ्याला ऐनुद्दिन जमादार यांच्याकडून दोन हजारांचे बक्षीस व मानाचा फेटा देण्यात आला. कसबे डिग्रज बोट क्लबने तो पटकावला. सूत्रसंचालन दीपक पाटील यांनी केले.
भिलवडी कृष्णा घाटावर भरण्यात आलेल्या होड्यांच्या शर्यती पाहण्यासाठी शर्यत शौकीनांंनी तुफान गर्दी केली होती. या शर्यती बरोबरच रिलस्टारच्याही स्पर्धा भरण्यात आल्या होत्या, यांचाही उत्स्फूर्त सहभाग होता.
