
दर्पण न्यूज विटा : प्रतिनिधी (शिराज शिकलगार) :-
गतका असोसिएशन, सांगली जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने शहर व जिल्हास्तरीय गतका खेळ निवड चाचणीचे आयोजन सौ. विजयमाला पतंगराव कदम प्रशाला, विटा येथे करण्यात आले. या निवड चाचणीत प्रशालेच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.
प्रशालेतील २२ खेळाडूंची सिंगल सोटी व परी सोटी या प्रकारांमध्ये विविध वयोगटांतून राज्यस्तरीय गतका स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेत प्रशालेच्या खेळाडूंनी आपल्या कौशल्याची प्रभावी चुणूक दाखवत तब्बल १८ सुवर्णपदके आणि ४ रौप्यपदके पटकावली.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विविध क्रीडा प्रकारांमध्ये संधी उपलब्ध करून देत त्यांच्यातील क्रीडागुणांना प्रोत्साहन देण्याचे काम प्रशालेकडून सातत्याने केले जात आहे. गतका या पारंपरिक व साहसी क्रीडा प्रकारात विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश प्रशालेच्या क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीत भर घालणारे आहे.
या निवड चाचणीस सांगली जिल्हा तालुका क्रीडा अधिकारी मा. विकास माने सर, प्रशालेचे संस्थापक रघुराज मेटकरी सर, सचिव डॉ. रवींद्र पवार सर, रवी साळुंखे, दीपक बाबर तसेच पालक उपस्थित होते. मान्यवरांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
१८ सुवर्ण व ४ रौप्य पदकांसह राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या २२ खेळाडूंच्या या यशाबद्दल प्रशालेत आनंदाचे वातावरण असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
