
दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी( शिराज शिकलगार) -:
महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ यांच्या वतीने आयोजित विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेच्या राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभात सौ. विजयमाला पतंगराव कदम प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, विटा या प्रशालेने उल्लेखनीय यश संपादन केले. शहरी विभागातून राज्यस्तरीय स्पर्धेत प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी तब्बल पाच क्रमांक मिळवत आपल्या गुणवत्तेची राज्यस्तरावर ठळक नोंद केली.
सोमवार, दि. १७ ऑगस्ट २०२६ रोजी ठाणे येथे विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. या स्पर्धेत प्रशालेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत राज्यस्तरावर यश मिळविले.
यामध्ये कु. प्रवीण सूर्यवंशी याने प्रथम क्रमांक, कु. श्रावणी माने हिने तृतीय क्रमांक, कु. श्रेया सुडके हिने चौथा क्रमांक, तर कु. खुशी भुले व कु. निकुंज म्हेत्रे यांनी अनुक्रमे पाचवा क्रमांक मिळविला. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे प्रशालेच्या शैक्षणिक गुणवत्तेला राज्यस्तरावर मानाचे स्थान प्राप्त झाले आहे.
विजेत्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिकाचा धनादेश, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत साहेब, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे मंत्री प्रताप सरनाईक साहेब तसेच सामाजिक वने विभागाचे मंत्री गणेश नाईक साहेब यांच्या हस्ते विद्यार्थ्यांनी पारितोषिके स्वीकारली.
यावेळी भारतमाता ज्ञानपीठ संस्थेचे कार्यवाह योगेश्वर मेटकरी प्रशालेच्या प्राचार्या वैशाली कोळेकर तसेच बक्षीसपात्र विद्यार्थी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव झाल्याने त्यांच्या यशाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
ज्ञानाचा प्रसार, वाचनाची आवड आणि विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला चालना देणाऱ्या विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेले हे यश विशेष कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांनी केवळ सहभाग नोंदविला नाही, तर राज्यस्तरावर प्रथम, तृतीय, चतुर्थ आणि पाचवा क्रमांक मिळवत आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटविला आहे. त्याबद्दल संस्थेचे संस्थापक सुप्रसिद्ध साहित्यिक रघुराज मेटकरी व संस्थेचे अध्यक्ष रेखा शेंडगे यांनी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे कौतुक केले
या यशाबद्दल संस्थेचे कार्यवाह योगेश्वर मेटकरी, प्राचार्या वैशाली कोळेकर, शिक्षकवृंद, पालक व विद्यार्थ्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचेही या यशात मोलाचे योगदान असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेतील या अभूतपूर्व यशामुळे सौ. विजयमाला पतंगराव कदम प्रशालेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
