दर्पण न्यूज पलूस भिलवडी (मुख्य संपादक अभिजीत रांजणे):- भिलवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावी करण्याबरोबरच तरुणांना व्यसनांच्या विळख्यातून दूर ठेवण्यासाठी व्यापक जनजागृती अभियान जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोषी ‘अप्पर पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर , पोलिस उपअधीक्षक तासगाव विभाग किरण अवचर ‘ यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार आहे . विनाकारण उपद्रव करून कायदा मोडला तर कंबरडे मोडणार, असा इशारा भिलवडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण दिडवाघ यांनी दिला.
ते भिलवडी येथे पत्रकारांशी आयोजित संवाद बैठकीत बोलत होते.
यावेळी दिडवाघ म्हणाले की, व्यसनाधीनतेमुळे अनेक तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त होत असून त्यांच्या कुटुंबांनाही मानसिक, सामाजिक आणि आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे तरुणांनी वेळेतच व्यसनापासून दूर राहावे, तसेच पालकांनी आपल्या पाल्यांच्या वर्तनावर जबाबदारीने लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
भिलवडी परिसर हा कृष्णा नदीच्या पाण्यामुळे समृद्ध असून प्रगतशील शेतकरी, शैक्षणिक संस्था, सामाजिक परंपरा आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा इतिहास लाभलेला भाग आहे. या परिसरातील नागरिकांना सुरक्षित वातावरण आणि न्याय मिळावा, यासाठी पोलिसांकडून अधिक सक्षम व लोकाभिमुख पोलीसिंग करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थांचा वापर, विक्री किंवा संशयास्पद हालचाली आढळल्यास नागरिकांनी तातडीने भिलवडी पोलिसांशी संपर्क साधावा. मिळालेल्या प्रत्येक माहितीची गोपनीयता राखून संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही दिडवाघ यांनी सांगितले.
व्यसन करून बेदरकार वाहन चालविणे, सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणे, महिलांची किंवा मुलींची छेडछाड काढणे, ग्रामस्थांना नाहक त्रास देणे अथवा अन्य बेकायदेशीर कृत्ये करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. रात्री अपरात्री विनाकारण बाजारपेठ किंवा संशयास्पद ठिकाणी फिरणाऱ्या व्यक्तींची चौकशी करून आवश्यक ती कारवाई केली जाईल. परिसरात कोणताही अनुचित प्रकार किंवा मोठी घटना घडण्याची शक्यता दिसल्यास नागरिकांनी त्वरित पोलिसांना माहिती देऊन कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण दिडवाघ यांनी केले.