दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुणे) :-
महाराष्ट्रातील शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षणमंत्री व महाराष्ट्र परीक्षा मंडळाच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी मुख्यमंत्री महोदयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई यांना दिलेल्या निवेदनात राजाभाऊ राऊत यांनी म्हटले आहे की, टीईटी परीक्षा ही लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असून परीक्षा प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह असणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र पेपरफुटीसारख्या गंभीर प्रकारामुळे मेहनत घेऊन तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाला असून शासनाच्या परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला आहे.
विद्यार्थ्यांनी वेळ, मेहनत आणि आर्थिक खर्च करून परीक्षेची तयारी केलेली असते. अशा प्रकारच्या गैरप्रकारांमुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या संधीवर परिणाम होतो आणि त्यांच्या भविष्याशी खेळ केला जातो. त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करून पेपरफुटीत सहभागी असलेल्या सर्व दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच संबंधित जबाबदार अधिकारी व व्यक्तींवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री मा. दादा भुसे तसेच महाराष्ट्र परीक्षा मंडळाच्या अध्यक्षांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही राजाभाऊ राऊत यांनी केली आहे.
भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी परीक्षा प्रणाली अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि सक्षम करण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सदर निवेदनाच्या गांभीर्याने दखल घेऊन तातडीने योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी राजाभाऊ राऊत यांनी केली आहे.