ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा विकास हेच ध्येय : आधुनिक कार्यपद्धतीने शाळेच्या प्रगतीचा आलेख उंचावणार
दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी (शिराज शिकलगार)-: भारती विद्यापीठ पुणे संचलित, यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय घोटी बुद्रुक च्या मुख्याध्यापक पदी श्री. शालिवान भालचंद्र लोखंडे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या याच विद्यालयात इंग्रजी विषयाचे अध्यापक म्हणून कार्यरत होते संस्थेने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान व विद्यार्थी विकासाच्या दृष्टीने मुख्याध्यापक पदी पदोन्नती केली आहे या नियुक्तीमुळे शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शिक्षक, पालक व ग्रामस्थांकडून त्यांचे स्वागत करण्यात येत आहे.
नूतन मुख्याध्यापक शालिवान लोखंडे यांनी यापूर्वी विविध शैक्षणिक-सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या अनुभवाचा व दूरदृष्टीचा लाभ विद्यालयाला होणार असल्याचा पालक वर्गातून विश्वास व्यक्त केला जात आहे.
मुख्याध्यापक पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर बोलताना श्री. शालिवान लोखंडे यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. शैक्षणिक गुणवत्तेसोबतच क्रीडा, सांस्कृतिक व तांत्रिक कौशल्यांवर भर देऊन विद्यार्थ्यांना सक्षम व आत्मनिर्भर बनविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. तसेच, डिजिटल शिक्षण, स्वच्छता, वृक्षारोपण आणि विविध स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी आगामी काळात विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
विद्यालयाच्या प्रगतीसाठी शिक्षकवर्ग, पालक आणि ग्रामस्थ यांचे सहकार्य आवश्यक असून सर्वांच्या मदतीने विद्यालयाला प्रगतीपथावर नेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.