
दर्पण न्यूज कोल्हापूर :- अनिल पाटील
चुये, ता. करवीर : ऊस उत्पादक शेतकरी व साखर उद्योगाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी पदवीधर मित्र संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष माणिक पाटील (चुयेकर) यांनी सुरू केलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाच्या सहाव्या दिवशी राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाशराव आबिटकर यांनी आंदोलनाची दखल घेत आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी माणिक पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस करून त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली.
यावेळी पालकमंत्री आबिटकर म्हणाले की, विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपण्यापूर्वी मुंबई येथे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी, साखर कारखान्यांचे प्रतिनिधी आणि माणिक पाटील (चुयेकर) यांच्या उपस्थितीत विशेष बैठक आयोजित करण्यात येईल. या बैठकीत आंदोलनातील सर्व मागण्यांवर सकारात्मक चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यामुळे माणिक पाटील यांनी आपल्या प्रकृतीचा विचार करून अन्नत्याग आंदोलन तातडीने मागे घ्यावे, असे भावनिक आवाहनही त्यांनी केले.
आबिटकर यांनी सांगितले की, ऊस उत्पादक शेतकरी आणि सहकारी साखर उद्योगाच्या समस्या गंभीर असून त्या शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात येतील. मुख्यमंत्री स्तरावर याबाबत सकारात्मक निर्णय व्हावा, यासाठी आपण स्वतः पुढाकार घेणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी आंदोलनस्थळी उपस्थित ग्रामस्थ, शेतकरी आणि विविध शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनीही पालकमंत्र्यांशी चर्चा केली. शासनाने केवळ आश्वासन न देता ठोस निर्णय घेऊन साखर उद्योगासमोरील प्रश्न सोडवावेत, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली.
माणिक पाटील (चुयेकर) यांनी पालकमंत्र्यांच्या आश्वासनाचे स्वागत केले. मात्र, शासनाकडून लेखी आणि ठोस निर्णयाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतरच आंदोलनाबाबत पुढील भूमिका जाहीर करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
पालकमंत्र्यांची प्रमुख आश्वासने
पावसाळी अधिवेशन संपण्यापूर्वी मुंबईत मुख्यमंत्र्यांसमवेत विशेष बैठक.
विविध शेतकरी संघटना व साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींना बैठकीसाठी निमंत्रण.
आंदोलनातील मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न.
माणिक पाटील (चुयेकर) यांनी प्रकृतीचा विचार करून अन्नत्याग आंदोलन थांबवावे, असे आवाहन.
आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांबाबत शासन गंभीर असल्याचे पालकमंत्र्यांचे आश्वासन.