

दर्पण न्यूज सांगली : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा 26 जून हा जन्मदिन सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने सांगली शहरात काढण्यात आलेली समता चित्ररथ व संविधान जागृती बाईक रॅली उत्साहात संपन्न झाली.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष व पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, सांगली एस.टी स्टँड परिसर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. याप्रसंगी उपस्थित शासकीय अधिकारी व नागरिकांनी एकत्रितपणे संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. तसेच समाजाला व्यसनाधीनतेपासून दूर ठेवण्याचा संदेश देत सर्वांनी नशामुक्तीची सामूहिक शपथ घेतली.
संविधान जागृती बाईक रॅलीला मोठा प्रतिसाद
भारतीय संविधानाविषयी जनमानसात जागृती निर्माण करण्यासाठी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही रॅली सांगली बसस्थानक परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून सुरू होऊन पुढे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, महानगरपालिका, सांगली सिटी पोस्ट ऑफिस मार्गे स्टेशन चौक सांगली येथे या रॅलीची सांगता झाली. बाईक रॅलीच्या माध्यमातून संविधानाचा जागर करुन संविधानाच्या माध्यमातून घराघरात समता पोहचविण्याचे कार्य करण्यात येणार असल्याचे यावेळी समाज कल्याण सांगली सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत यांनी प्रतिपादन केले.
लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात साहित्याचे वाटप
सामाजिक न्याय विभागाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने, या कार्यक्रमात ‘गटई स्टॉल योजना’ आणि ‘मिनी ट्रॅक्टर योजना’ या योजनांतर्गत मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभाचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास समाज कल्याण सांगली सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत, समाज कल्याण अधिकारी योगेश मगदूम, दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सहाय्यक सल्लागार मंजिरी माने, नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, समाज कल्याण, इतर मागास बहुजन कल्याण विभाग तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त पुरस्कार्थी , सहाय्यक सेवाभावी संस्था खटाव व इतर विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि सांगलीकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.