दर्पण न्यूज विटा -खानापूर तालुका प्रतिनिधी( शिराज शिकलगार): –
लोकनेते मा. हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचालित आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर, विटा येथील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागाचा विद्यार्थी शुभम माणिक जरे याने जागतिक स्तरावरील उच्च शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या ग्रॅज्युएट रेकॉर्ड एक्झाम परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
शुभम याने या परीक्षेत एकूण ३१८ गुण (शाब्दिक तर्कशक्ती – १५६, संख्यात्मक तर्कशास्त्र – १६२) प्राप्त केले. तसेच शाब्दिक तर्कशक्ती मध्ये ९२ पर्सेंटाइल, संख्यात्मक तर्कशास्त्र मध्ये ९३ पर्सेंटाइल आणि विश्लेषणात्मक लेखन मध्ये ३.५ गुणांसह ८९ पर्सेंटाइल मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याला परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेशाच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत.
आजच्या जागतिक स्पर्धेच्या युगात या सारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत यश मिळविणे ही अत्यंत अभिमानास्पद बाब असून, शुभमच्या या यशामुळे संस्थेतील इतर विद्यार्थ्यांनाही परदेशी शिक्षणासाठी प्रेरणा मिळणार आहे. हे यश विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे तसेच संस्थेच्या दर्जेदार शिक्षण व प्रभावी मार्गदर्शनाचे प्रतीक आहे.
संस्थेचे संस्थापक मा. सदाशिवराव भाऊ पाटील यांनी शुभमचे विशेष अभिनंदन करून त्याच्या भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. संस्थेचे अध्यक्ष अॅड. वैभवदादा पाटील यांनी विद्यार्थ्याचा गौरव करताना त्याच्या पालकांचे, शिक्षकांचे आणि विभागातील सर्व प्राध्यापकांचे अभिनंदन केले. हे यश विद्यार्थ्याच्या कठोर परिश्रमाचे आणि संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे फलित असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी कार्यकारी संचालक श्री. पी. टी. पाटील, संचालिका कु. पूजा पाटील तसेच आर्थिक संचालक श्री. रविराज सूर्यवंशी यांनी शुभमच्या यशाबद्दल अभिनंदन करून त्याच्या पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. पी. एस. पाटील, रजिस्ट्रार श्री. ए. डी. चव्हाण, सर्व अधिष्ठाता , विभाग प्रमुख इंटरनॅशनल अफेअर्स सेल समन्वयक प्रा. आर. बी. पाटील, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागप्रमुख प्रा. डॉ. व्ही. बी. इंगळे, विभाग समन्वयक प्रा. डी. के. जाधव तसेच सर्व प्राध्यापकांनी शुभमचे विशेष अभिनंदन केले.
आदर्श इन्स्टिट्यूट विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच जागतिक दर्जाच्या शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून, विद्यार्थ्यांची अशी यशस्वी कामगिरी ही संस्थेच्या दर्जेदार शिक्षणाची व सक्षम मार्गदर्शनाची ठळक पावती आहे. महाविद्यालयाच्या वतीने शुभम माणिक जरे यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा संस्थेचे अध्यक्ष अँड वैभव दादा पाटील यांनी दिल्या.