दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने) :- धाराशिव जिल्ह्यात अवैध व्यवसायांचे कंबरडे मोडण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत पोलीस प्रशासनाने आतापर्यंतची सर्वात मोठी आणि थरारक कारवाई केली आहे. मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रीतु खोखर व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली, परि.पोलीस उपअधीक्षक श्री.अमोल मोहिते यांचा पथकाने कळंब परिसरातील एका भव्य जुगार अड्ड्यावर धाडसी छापेमारी केली. या कारवाईत तब्बल ५९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, ही धाराशिव जिल्ह्यातील आजवरची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
पोलीस उपअधीक्षकांच्या नेतृत्वाखाली अचूक रणनीती:
कळंब-ढोकी रोडवरील (हॉटेल हिमालय बारचा शेजारी) ‘संदीप कला ,क्रीडा व सांस्कृतिक मंडळ’ येथे क्लब नोंदणीच्या परवान्याचा गैरवापर करून, सर्व नियम धाब्यावर बसवून अत्यंत पद्धतशीरपणे तीन पत्ती (तिरट) हा जुगार चालवला जात होता. या अड्ड्याची खात्रीशीर गोपनीय माहिती मिळताच, पोलीस उपअधीक्षक अमोल मोहिते यांनी अत्यंत गुप्तपणे सापळा रचून स्वतः या मोहिमेचे नेतृत्व केले. त्यांच्या विशेष पथकाने रात्रीच्या वेळी अचानक छापा टाकून संपूर्ण जुगार अड्डा जागच्या जागी उद्ध्वस्त केला.
तब्बल ५९ जणांवर गुन्हे दाखल,२० लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे जुगार बहादरांमध्ये एकच खळबळ उडाली. घटनास्थळावरून ५४ जणांना रंगेहात ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये जुगार खेळणारे आणि क्लबचे ५ संचालक अशा तब्बल ५९ जणांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम चे कलम ४ आणि ५ अन्वये कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी जुगाराच्या साहित्यासह, रोख रक्कम,मोबाईल, चारचाकी आणि दुचाकी वाहने असा एकूण १९, ९६, ०५० रुपयांचा मुद्देमालही जप्त केला आहे.
कारवाईत सहभागी पथक:
पोलीस उपअधीक्षकांच्या थेट नेतृत्वाखालील या यशस्वी कामगिरीत सहायक पोलीस निरीक्षक श्री. प्रवीण सोमवंशी, श्री. सुरेश कासुळे, पोलीस उपनिरीक्षक श्री. रामचंद्र बहुरे तसेच आरसीपी (RCP) आणि क्यूआरटी (QRT) या विशेष पथकांतील अंमलदार व चालकांनी महत्वाची भूमिका बजावली.
जिल्ह्यातील अवैध जुगार, मटका, हातभट्टी व अमली पदार्थांच्या व्यापाराविरोधात पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. पोलीस उपअधीक्षकांच्या विशेष पथकाकडून अशा बेकायदेशीर कृत्यांविरोधात यापुढेही गोपनीय व प्रभावी कारवाया सुरू राहणार असून, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.