दर्पण न्यूज कोल्हापूर :- अनिल पाटील
कोल्हापूरच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे प्रतीक असलेल्या राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवनाच्या नूतनीकरण कामाचे उद्घाटन शुक्रवार, दि. 26 जून 2026 रोजी सकाळी 9.30 वाजता संपन्न होणार आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर व खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते या नूतनीकरण झालेल्या भवनाचे उद्घाटन होणार असून, कार्यक्रमास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री माधुरीताई मिसाळ, जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. या उद्घाटन समारंभास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले आहे.
तसेच राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे प्रतिवर्षी 26 रोजी ‘राजर्षी शाहू जयंती’ साजरी केली जाते. त्यानुसार 21 ते 25 जूनपर्यत राजर्षी शाहू व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. 26 जून रोजी सायं. 6 वाजता सन 2026 चा जेष्ठ इतिहास संशोधक स्व.डॉ. जयसिंगराव पवार यांना (मरणोत्तर) ‘राजर्षी शाहू पुरस्कार’ खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते व सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रदान करण्यात येणार आहे.