दर्पण न्यूज पलूस प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे दिला जाणारा कोल्हापूर विभागाचा प्रतिष्ठेचा जिजामाता कृषिभूषण पुरस्कार-२०२४ हा पुरस्कार बुर्ली (ता. पलूस) येथील माजी सरपंच प्रगतशील महिला शेतकरी सौ. पुष्पावती भिमराव मिठारी (काकी) यांना जाहीर झाला आहे. या बद्दल स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीपअप्पा कदम यांनी सौ. पुष्पावती मिठारी यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत, त्यांच्या कार्यामुळे इतर शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
सौ. मिठारी यांच्या निवडीमुळे पलूस तालुक्यासह सांगली जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सौ. मिठारी यांनी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करून विविध पिकांचे विक्रमी उत्पादन घेत शेती क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. शेतीमध्ये नवनवीन प्रयोग, आधुनिक पद्धतींचा वापर आणि उत्पादनवाढीसाठी केलेल्या प्रयत्नांमुळे त्यांना हा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्या बुर्ली गावच्या माजी सरपंच असून सामाजिक व कृषी क्षेत्रातही त्यांचे उल्लेखनीय योगदान राहिले आहे.
दरम्यान, जिजामाता कृषिभूषण पुरस्कार-२०२४ वितरण सोहळा दि. १ जुलै २०२६ रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात आला असून, राज्याचे कृषिमंत्री व मुख्यमंत्री यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.