दर्पण न्यूज मिरज /सांगली : ग्रामीण भागातील जनता, शेतकरी विद्यार्थी आणि महिलांच्या महसूल विषयक समस्यांचे त्वरित निराकरण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान राबविण्यात येत आहे. अपर तहसीलदार कार्यालय, सांगली अंतर्गत कुपवाड मंडळामध्ये इनामदार मल्टीपर्पज हॉल, आंबा चौक, कुपवाड येथे दि. 8 मे रोजी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन अपर तहसिलदार अश्विनी वरूटे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
या शिबीरामध्ये एकाच छताखाली, एकाच दिवशी प्रमाणपत्रे उत्पन्न, रहिवासी, जात आणि नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रांचे तात्काळ वाटप, ७/१२ व ८-अ उतारा, प्रलंबित फेरफार प्रकरणे निकाली काढणे आणि ७/१२ मधील चुकांची दुरुस्ती, डिजिटल सेवाः ई-मोजणी, अॅग्रीस्टॅक, पीएम किसान योजना आणि डिजिटल स्वाक्षरीयुक्त ७/१२ ची माहिती व वाटप ही कामे मार्गी लावली जातील. तसेच, नवीन सुधारणा अकृषक (NA) वापरासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र परवानगीची गरज नसून, विकास आराखडा मंजुरी हीच परवानगी मानली जाईल.
या अभियानाद्वारे पारदर्शक आणि सौजन्याने सेवा देण्याचा प्रशासनाचा मानस आहे. सर्व नागरिक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांनी आपल्या आवश्यक कागदपत्रांसह (आधार कार्ड, फोटो, संबंधित दस्तऐवज) शिबीर स्थळी उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.