दर्पण न्यूज मिरज / सांगली : ‘चांदणे शब्द सुरांचे’ हा आकाशवाणी सांगली आयोजित सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम, शनिवार, दिनांक 9 मे रोजी सांगलीत केशवराव आप्पाजी चौगुले ऑडिटोरियम, राजनेमी परिसर, लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे प्रांगण कॉलेज कॉर्नर, सांगली येथे सायंकाळी 6 वाजता संपन्न होत आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. सांगली परिसरातील रसिकांनी या उपक्रमाला भरभरुन प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आकाशवाणी सांगली केंद्राचे सहाय्यक संचालक (कार्यक्रम) श्रीनिवास जरंडीकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
ऑल इंडिया रेडिओ अर्थात आकाशवाणी ही देशव्यापी संस्था आपले नव्वदावे वर्ष साजरे करत आहे. देशभरातील आकाशवाणी केंद्रांमध्ये त्यानिमित्ताने विशेष कार्यक्रम साजरे होत आहेत. याचाच एक भाग म्हणून आकाशवाणी सांगलीच्या वतीने ‘चांदणे शब्द सुरांचे ‘ या विशेष रंगमंचीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमात यशश्री जोशी, ओंकार कुष्टे आणि श्रीरंग जोशी हे आकाशवाणीचे मान्यताप्राप्त कलाकार मूळ आकाशवाणी निर्मित विविध लोकप्रिय गीते सादर करतील. यामध्ये गीतरामायण, संतवाणी तसेच शुक्रतारा, चांदणे शिंपीत जाशी यांसारख्या सुमधुर गीतांचा समावेश आहे. त्यांना प्रशांत भाटे, केदार सांभारे, विनायक हसबनीस, मयूर जोशी साथ- संगत करणार आहेत. शशांक लिमये यांचे निवेदन असल्याचे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.