दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुणे):- येडशी दि. 4 मे 2026 — येडशी गावातील गंभीर पाणीटंचाई, अनियमित पाणीपुरवठा, वाढते गॅस दर आणि पेट्रोल-डिझेल दरवाढ यांविरोधात शिवसेनेने (उबाठा) तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून, 7 मे रोजी सकाळी 10 वाजता येडशीतील छत्रपती संभाजी महाराज चौक येथे ‘बेमुदत ठिय्या आंदोलन’ करण्याची घोषणा करण्यात आली आहे. निवेदनानुसार, सुमारे 25 हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या येडशी गावाला अद्याप कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना उपलब्ध नाही. गावात टँकर, पाइपलाइन व तलावातील पाणी असतानाही नियमित पुरवठा होत नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती अधिक बिकट झाली असून, नागरिक व जनावरांचे हाल होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच पाणीटंचाईमुळे नागरिकांचे आर्थिक नुकसानही होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. याशिवाय, गॅसच्या दरवाढीमुळे व अनियमित पुरवठ्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत असून, पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे शेतीकाम, वाहतूक आणि दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. प्रशासनाने या सर्व प्रश्नांची तातडीने दखल घेऊन तोडगा काढावा, अन्यथा 7 मे रोजी होणाऱ्या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रती पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक (ग्रामीण) तसेच गट विकास अधिकारी व ग्रामपंचायत येडशी यांनाही देण्यात आल्या आहेत.