
दर्पण न्यूज कोल्हापूर :- भारतीय जनगणनेच्या इतिहासातील पहिल्या ‘डिजिटल जनगणने’च्या पहिल्या टप्प्याला १ मे म्हणणेच महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून शुक्रवारपासून जिल्ह्यात प्रारंभ झाला. मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभानंतर पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि खासदार शाहू छत्रपती यांनी ‘स्व’-गणना मोहिमेस स्वतःपासून प्रारंभ करत एक आदर्श घालून दिला . या ऐतिहासिक प्रक्रियेत नागरिकांना स्वतःची माहिती स्वतः भरण्याची संधी देणारे ‘स्वगणना’ पोर्टल महाराष्ट्रासाठी कार्यान्वित केले गेले आहे . माहिती संकलनाच्या पहिल्या टप्प्यात ‘घरांची यादी आणि गृहनिर्माण’ या विषयावर भर दिला जाणार असून या जनगणनेच्या प्रक्रियेत नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन संपूर्ण देशात कोल्हापूरला अग्रस्थानी आणावे असे आवाहन या दोन्ही मान्यवरांनी केले . या मोहिमेत https://se.census.gov.in या अधिकृत पोर्टलवर नागरिकांनी १ ते १५ मे या कालावधीत आपली माहिती भरावयाची आहे. ही प्रक्रिया अत्यंत सुरक्षित आणि गोपनीय आहे . यामध्ये घराची स्थिती, उपलब्ध भौतिक सुविधा आणि कुटुंबाची मालमत्ता यासारखी ‘संख्यात्मक’ माहिती संकलित केली जाणार असून ही प्रक्रिया पूर्णपणे नि:शुल्क आहे .नागरिकांनी कोणत्याही फसव्या लिंकवर विश्वास ठेवू नये किंवा आपला ओटीपी कोणालाही शेअर करू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. आधुनिक भारताच्या उभारणीसाठी आवश्यक असलेला अचूक डेटाबेस तयार करण्यासाठी या मोहिमेची मदत होणार आहे.