
दर्पण न्यूज मिरज / सांगली : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात राज्य लोकसेवा हक्क दिन साजरा करण्यात आला. या अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करावी, नागरिकांना विहित वेळेत सेवा द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी यावेळी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित या कार्यक्रम प्रसंगी अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) सविता लष्करे, रघुनाथ पोटे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रदीप पोटे व्यासपीठावर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, लोकसेवा हक्क कायद्याच्या अनुषंगाने सर्व कार्यालयांनी नागरिकांना विहित मुदतीत सेवा द्याव्यात. कायद्यांतर्गत प्राप्त प्रथम व व्दितीय अपिलांचा आढावा दैनंदिन पातळीवर घेऊन त्यांची विहित मुदतीत निर्गती केली जाईल याची दक्षता घ्यावी. आपले सरकार पोर्टलवरील प्रलंबित तक्रारींचे निवारण तात्काळ करावे. तसेच केंद्रावर अधिकृत बोर्ड आणि क्यु आर कोडचा वापर सुनिश्चित करण्यात यावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
प्रास्ताविकात निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे यांनी कार्यक्रमाचा हेतू विषद केला व उपस्थितांना महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 ची शपथ दिली. जिल्हा समन्वयक मेघेष गटला यांनी आरटीएम डॅशबोर्ड वापरासंबंधी प्रशिक्षण दिले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.