


दर्पण न्यूज पुणे :-:भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचा ‘स्थापना दिन’ आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा दिवस केवळ वर्धापन दिन नसून, आमचे संस्थापक आदरणीय डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्या उदात्त स्वप्नपूर्तीचा प्रेरणादायी उत्सव आहे.
सांगली जिल्ह्यातील सोनसळ या छोट्याशा गावातून सुरू झालेला साहेबांचा जीवनप्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. प्रतिकूल परिस्थितीत शिक्षणासाठी मैलोनमैल पायी प्रवास करणाऱ्या त्या जिद्दी तरुणाने, अथक परिश्रम, चिकाटी आणि दूरदृष्टीच्या बळावर जागतिक दर्जाच्या विद्यापीठाची उभारणी केली. ‘शिक्षणाद्वारे सामाजिक परिवर्तन’ या त्यांच्या ध्येयातून संस्थेची भक्कम पायाभरणी झाली. १९९६ साली ‘अभिमत विश्वविद्यालय’ म्हणून मिळालेली मान्यता, आज ‘नॅक’चा ‘A++’ दर्जा, केंद्र सरकारचे ‘A’ ग्रेड मानांकन आणि NIRF रँकिंगमधील आमची झेप, ही आमच्या गुणवत्तेची साक्ष आहे. आज भारती विद्यापीठाचे विद्यार्थी जगभर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करत आहेत.
या शुभदिनाचे औचित्य साधून अत्याधुनिक आयव्हीएफ (IVF) केंद्र आणि नूतन नेत्र उपचार केंद्राचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. समाजातील सर्व घटकांना जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या आमच्या सामाजिक बांधिलकीला यामुळे अधिक बळ मिळणार आहे. याच प्रसंगी विद्यापीठाच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशनही करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. अतुल सावे (अक्षय ऊर्जा व दुग्धविकास मंत्री, महाराष्ट्र राज्य) आणि मा. श्री. प्रकाशराव आबिटकर (सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री, महाराष्ट्र राज्य) उपस्थित होते. तसेच कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कुलगुरू डॉ. विवेक साओजी, प्र-कुलगुरू व सचिव माननीय डॉ. विश्वजीत कदम, कुलसचिव श्री. जी. जयकुमार, भारती वैद्यकीय संशोधन संस्थेच्या संचालिका अस्मिता कदम जगताप व मान्यवर, विद्यार्थी, कर्मचारी,शिक्षक यांची उपस्थिती होती.
स्थापना दिनाच्या औचित्याने आयोजित या गौरवशाली सोहळ्यात, IRSHA चे डॉ. ए. सी. मिश्रा आणि त्यांच्या टीमने संस्थात्मक पुरस्कार स्वीकारला. वैयक्तिक श्रेणीत प्रा. डॉ. वर्षा पोखरकर, प्रा. डॉ. सचिन चव्हाण, डॉ. रमा भाडेकर आणि डॉ. सारा मरियम यांचा सन्मान करण्यात आला. तसेच Distinguished Alumni Award द्वारे डॉ. संजय गांधी आणि कु. गुंजन सैनी यांचा गौरव करण्यात आला.