दर्पण न्यूज कोल्हापूर :- राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी आखून दिलेल्या न्याय, बंधुता व समता या त्रिसूत्रीवर आपण कामकाज करणार असल्याची ग्वाही नूतन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिली. निमित्त होते ….जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात नूतन जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत तर मावळत्या जिल्हाधिकाऱ्यांना निरोप समारंभाचे. मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या हस्ते नूतन जिल्हाधिकारी डॉ. राठोड व मावळते जिल्हाधिकारी श्री येडगे यांना छत्रपती शाहू महाराजांचा पूर्णाकृती पुतळा व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.जॅस्मिन, अति.पोलीस अधिक्षक डॉ.धीरजकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, महसूल उपजिल्हाधिकारी डॉ.संपत खिलारी, प्रांताधिकारी समीर शिंगटे, प्रांताधिकारी मोसमी बर्डे-चौगुले, प्रांतधिकारी प्रसाद चौगुले आदी उपस्थित होते. श्री. राठोड म्हणाले, कोल्हापूर हे शहर नाही तर ती एक भावना आहे. श्री. अमोल येडगे यांनी कोल्हापुरात लक्षणीय सुधारणा केल्या. त्यांनी सुधारण्याच्या रचलेल्या पायावर, कळस चढवण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध राहू या. यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले. तर अमोल येडगे म्हणाले, कोल्हापूर जिल्हा म्हणजे माणुसकीचा जिवंत झरा असलेला जिल्हा होय. कोल्हापूरकर हे सतत नाविन्यतेचा ध्यास घेणारे आहेत. चांगल्या बाबींच्या पाठीशी ते नेहमी खंबीरपणाने उभे राहतात. माझ्या कारकिर्दीत सर्किट बेंच कार्यरत करता आले हा माझ्यासाठी अत्यंत अभिमानास्पद क्षण आहे. कोल्हापूरकरांचे प्रेम सदैव कायम स्मरणात राहील. निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव म्हणाले, श्री येडगे यांनी प्रशासनाला मानवी चेहरा देण्याचे काम केले.कोल्हापूरकरांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी ते सदैव कार्यरत राहिले. यावेळी श्री खिलारी व शिंगटे यांच्यासह अनेकांनी मावळते जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. नूतन जिल्हाधिकारी श्री. राठोड यांनी 2 एप्रिल रोजीच ऑनलाईन कार्यभार स्वीकारला होता. अत्यंत भावस्पर्शी झालेल्या या कार्यक्रमात श्री. येडगे यांना आणखीन थोडा अवधी मिळायला हवा होता अशीच भावना सर्वसामान्य कोल्हापूरकरांची झाली होती. 00000 नूतन जिल्हाधिकाऱ्यांचा थोडक्यात परिचय. नाव :- डॉ :विजय चंद्रकांत राठोड बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील ठाकरवाडीतांडा येथील रहिवाशी . महाराष्ट्र कॅडरचे 2014 बॅचचे ते आयएएस आहेत. यापूर्वी त्यांनी दर्यापूर (जि.अमरावती) या ठिकाणी प्रांत अधिकारी, गडचिरोलीला मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प), मीरा-भाईंदर महानगरपालिका या ठिकाणी – आयुक्त, मुंबईला अतिरिक्त मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात सह मुख्य कार्यकारी अधिकारी तर जालना येथे जिल्हाधिकारी म्हणून कामकाज पाहिले आहे. अतिशय शिस्तबद्ध अधिकारी म्हणून त्यांची प्रशासनात ओळख आहे.