दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने). :-
कळंब तालुक्यातील भोसा गावातील विद्यार्थी गेल्या अनेक वर्षांपासून एस.टी. बस सेवेअभावी शिक्षणासाठी मोठ्या अडचणींचा सामना करत आहेत. सध्या सुमारे 50 विद्यार्थी दररोज गौर, कळंब व धाराशिव येथे शिक्षणासाठी जातात. मात्र बस सुविधा नसल्यामुळे त्यांना पायी अथवा खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो, ज्यामुळे वेळ, खर्च आणि सुरक्षिततेचे प्रश्न निर्माण होत आहेत.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) कळंब तालुकाध्यक्ष प्रा. तुषार वाघमारे, यांनी पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आगार प्रमुखांकडे निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात कळंब-भोसा मार्गावर नियमित एस.टी. बस सेवा सुरू करावी, तसेच कळंब-गौर-धाराशिव या मार्गावरील बस भोसा येथे वळवावी अशी ठोस मागणी करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या दृष्टीने बस सुविधा अत्यंत आवश्यक असून, विशेषतः उन्हाळा व पावसाळ्यातील कठीण परिस्थितीत विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक विद्यार्थिनींना सुरक्षित प्रवासाच्या अभावामुळे शिक्षण सोडण्याची वेळ येते, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे.
त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन भोसा येथे
एस.टी. बस सेवा सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण सुलभ होऊन त्यांच्या भविष्याला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी शहराध्यक्ष मुसादिक काजी, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष जिकराईल पटेल, सोशल मिडीया जिल्हा उपाध्यक्ष चेतन वाघमारे, कळंब तालुका सचिव वाहेद पटेल,भिवाजी ताकपीरे आदी उपस्थित होते.