
दिव्यांग बांधवांसाठी शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणार : प्रदीप (आप्पा) कदम
दर्पण न्यूज पलूस:- भारतीय संस्कृतीतील साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याचे औचित्य साधून, बुर्ली येथे ‘प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटना महाराष्ट्र राज्य’ शाखा-बुर्ली च्या फलकाचे अनावरण अत्यंत उत्साहात पार पडले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मा. प्रदीप (आप्पा) कदम यांच्या शुभ हस्ते फीत कापून आणि श्रीफळ वाढवून या शाखेचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना प्रदीप आप्पा कदम यांनी दिव्यांग बांधवांसाठी असलेल्या शासकीय योजनांची माहिती दिली. ते म्हणाले की, “राज्य शासनाने चालू अर्थसंकल्पात दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव तरतूद केली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या (DPC) माध्यमातून दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी १% निधी राखीव ठेवण्यात आला आहे.”
याशिवाय दिव्यांग बांधवांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी १५,००० रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य, कौशल्य विकासाद्वारे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, उल्लेखनीय कार्यासाठी १०,००० रुपये रोख बक्षीस व सन्मान हे सर्व लाभ पलूस तालुक्यातील व बुर्ली परिसरातील प्रत्येक गरजू दिव्यांग बांधवापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे शब्द त्यांनी यावेळी दिले.
या उद्घाटन सोहळ्याला संघटनेचे पदाधिकारी आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने: तालुका अध्यक्ष प्रहार संघटना सूर्यकांत सुतार, राजू सुतार, संजय चौगुले, संजय पवार, संतोष चौगुले, अमोल चौगुले, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी बुर्लीचे नेते राहुल पाटील,भालचंद्र पाटील, गोरख पाटील, रविकांत सुतार, मौला इनामदार, अरुण सुतार, दिलीप मिठारी,रामचंद्र पुणेकर, सुनील कुंभार, सनी काळे, संजय शिंदे, तुषार सूर्यवंशी, अभिजीत सावंत, अभिजीत कौलगे, सागर मासाळ यांसह अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
“जो का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले…” या ब्रीदवाक्याला स्मरून बुर्ली येथील ही शाखा आता दिव्यांग बांधवांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी हक्काचे व्यासपीठ ठरणार आहे, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.