दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी (शिराज शिकलगार): सौ. विजयमाला पतंगराव कदम प्रशाला, विटा येथील फाउंडेशन विभागाच्या वतीने बुधवार, दिनांक १९ ऑगस्ट २०२६ रोजी शोभा बाबर आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्पिटल, गार्डी येथे विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली.
या क्षेत्रभेटीत फाउंडेशन विभागातील इयत्ता सातवी, आठवी, नववी व दहावीतील ८८ विद्यार्थी सहभागी झाले. विद्यार्थ्यांना BAMS (Bachelor of Ayurvedic Medicine and Surgery) या वैद्यकीय अभ्यासक्रमाची माहिती, अभ्यासक्रमाची रचना, महाविद्यालयातील शैक्षणिक कार्यपद्धती तसेच प्रात्यक्षिकांचे स्वरूप यांचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. विविध विषयांचे प्रॅक्टिकल कसे घेतले जातात, वैद्यकीय शिक्षणामध्ये प्रत्यक्ष अनुभवाचे महत्त्व काय आहे, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य अभिजीत निकम सर, बारशिंग सर तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत त्यांनी वैद्यकीय शिक्षण व BAMS अभ्यासक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांच्या सहकार्यामुळे ही शैक्षणिक क्षेत्रभेट विद्यार्थ्यांसाठी अत्यंत ज्ञानवर्धक व संस्मरणीय ठरली.
या क्षेत्रभेटीसाठी प्रशालेकडून अभिजीत निरगुडे सर, शुभम वरुडे सर, सागर कचरे सर, निकिता कोरे मॅडम, प्रियंका करजगी मॅडम व पूर्वा पाटील मॅडम उपस्थित होते.
प्रशाला फाउंडेशन विभागातील विद्यार्थ्यांसाठी सातत्याने विविध शैक्षणिक उपक्रम व क्षेत्रभेटी आयोजित करून ‘प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण’ या संकल्पनेवर भर देत आहे. पाठ्यपुस्तकातील ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रांचा प्रत्यक्ष परिचय करून देणे, त्यांच्या जिज्ञासेला चालना देणे आणि भविष्यातील करिअरच्या संधींबाबत मार्गदर्शन करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
या यशस्वी शैक्षणिक क्षेत्रभेटीबद्दल विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.
