दर्पण न्यूज मिरज / सांगली : आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त युवकांमध्ये एचआयव्ही-एड्सविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, सांगली यांच्या वतीने आज सांगली शहरात जनजागृती प्रभातफेरी काढण्यात आली. युवकांनी एचआयव्ही-एड्सविषयी योग्य माहिती जाणून घेऊन समाजात जनजागृती करण्याचा संदेश या प्रभातफेरीतून देण्यात आला.
जनजागृती प्रभातफेरीचे उद्घाटन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, सांगली तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. यावेळी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी विवेक सावंत, जिल्हा पर्यवेक्षक प्रमोद संकपाळ यांच्यासह शासकीय रूग्णालयाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
प्रभातफेरीची सुरुवात पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली येथून झाली. त्यानंतर प्रभातफेरी सांगली शहरातील झुलेलाल चौकापर्यंत नेण्यात आली व तेथून पुन्हा पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली येथे तिचा समारोप करण्यात आला.
प्रभातफेरीनंतर पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली येथे डॉ. गुलाबराव पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, मिरजच्या विद्यार्थीनींनी फ्लॅश मॉब सादरीकरण केले. या माध्यमातून युवकांना युवा दिनाचा सकारात्मक संदेश देतानाच एचआयव्ही-एड्स प्रतिबंधाबाबत जनजागृती करण्यात आली.
या जनजागृती प्रभातफेरीसाठी सांगली जिल्ह्यातील कार्यरत 18 रेड रिबन क्लबअंतर्गत असलेल्या महाविद्यालयांसह इतर महाविद्यालयांनाही सहभागी होण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. या प्रभातफेरीमध्ये पद्मभूषण वसंतदादा पाटील नर्सिंग कॉलेज, शासकीय रुग्णालय सांगली, विद्यासागर नर्सिंग कॉलेज सांगली, डॉ. गुलाबराव पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज मिरज, श्री स्वामी विवेकानंद फार्मसी कॉलेज मिरज, डॉ. पतंगराव कदम कॉलेज सांगलीवाडी येथील विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
प्रभातफेरी सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाचे जिल्हा पर्यवेक्षक प्रमोद संकपाळ यांच्यासह कक्षातील कर्मचारी, आयसीटीसी कर्मचारी, गुप्तरोग विभागाचे कर्मचारी, एआरटी कर्मचारी तसेच विविध स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य लाभले. यामध्ये आधार वेल्फेअर सोसायटी, संग्राम संस्था सांगली, विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठान बामणोली आणि विवान सांगली-मिरज यांचा सहभाग होता.
