दर्पण न्यूज कोल्हापूर : जिल्ह्यातील दोन्ही महानगरपालिका तसेच सर्व नगरपालिकांमधील सफाई कर्मचाऱ्यांसंदर्भात शासनाचे निर्णय व परिपत्रकांची प्रभावी अंमलबजावणी करून त्यांना सर्व शासकीय लाभ विहित वेळेत उपलब्ध करून द्यावेत, अशा सूचना अतिरीक्त जिल्हाधिकारी अजय पवार यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विविध संघटनांनी, विशेषतः अखिल भारतीय सफाई मजदूर युनियन (कोल्हापूर जिल्हा) यांनी सादर केलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत विविध मागण्यांचा आढावा घेण्यात आला. यावेळी समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे, पोलीस उपअधीक्षक (गृह) सुवर्णा पत्की, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सरीता थोरात, कोल्हापूर महानगरपालिकेचे उपायुक्त परितोष कंकाळ, सहआयुक्त रामचंद्र काटकर, इचलकरंजी महानगरपालिकेचे सहआयुक्त सुनील शिंदे, अखिल भारतीय सफाई मजदूर युनियनचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अशोक मारुडा, युनियनचे पदाधिकारी तसेच विविध नगरपालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते.
यावेळी अतिरीक्त जिल्हाधिकारी पवार म्हणाले की, सफाई कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी शासनाने सुरू केलेल्या विविध योजना व प्रशासकीय लाभ त्यांना विहित वेळेत मिळणे आवश्यक आहे. संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण करून पात्र कर्मचाऱ्यांना लाभ उपलब्ध करून द्यावेत.
बैठकीत रिक्त पदांची भरती, अनुकंपा नियुक्ती, घरकूल योजना, सुरक्षा साधनांचा पुरवठा आदी विषयांचा आढावा घेण्यात आला. तसेच अखिल भारतीय सफाई मजदूर युनियनने सादर केलेल्या निवेदनातील विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
००००००