महाराष्ट्रसांगली

कृषि क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी ठिबक सिंचन योजनांचे अनुदान वाढविणार : कृषि मंत्री दादाजी भुसे

सांगली : महाराष्ट्राचे शेती क्षेत्र वाढविण्यासाठी व पाण्याचे सुयोग्य नियोजन करण्यासाठी ठिबक सिंचन योजना राबविणे ही काळाची गरज झाली आहे. ठिबक सिंचनाव्दारे महाराष्ट्रातील जास्तीत जास्त कृषि क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी ठिबक सिंचन योजनांचे अनुदान वाढविण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन कृषि व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.

श्री महादेव सहकारी पाणीपुरवठा संस्था मर्यादीत गोटखिंडी येथे संस्था पहाणी तसेच स्थानिक शेतकऱ्यांशी चर्चा व आष्टा येथे कृषिरत्न पुरस्कारार्थी प्राप्त संजीव माने यांचा सत्कार समारंभ आणि शेतकऱ्यांशी संवाद या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार धैर्यशील माने, कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार प्रकाश आबीटकर, राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी, उमेश पाटील, उपविभागीय कृषि अधिकारी मनोज वेताळ, श्री महादेव सहकारी पाणीपुरवठा संस्थेचे अध्यक्ष विनायकराव पाटील, आनंदराव पवार, विराज शिंदे, श्रेणीक कबाडे आदि मान्यवर उपस्थित होते.

कृषि मंत्री दादाजी भुसे म्हणाले, राज्यामध्ये शेतीला काही ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष आहे तर काही ठिकाणी अति पाण्यामुळे शेती नापीक होत चालली आहे. या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सहकारी पाणीपुरवठा संस्थांच्या माध्यमातून भूमीगत ठिबक सिंचन योजना राबविणे अत्यंत आवश्यक झाले आहे. ठिबक सिंचन योजनांमुळे जमिनीचा पोत सुधारण्याबरोबरच भरघोस उत्पन्न वाढीसाठीही उपयोग होतो. त्यामुळे शेतीची नापिकता होत नाही. ठिबक सिंचन योजनांमुळे शेतकऱ्याला मजूराचा खर्च, खतांचा खर्च कमी होण्यास मदत होते. यामुळे शेतकऱ्यांच्या हातात जास्तीचे चार पैसे उपलब्ध होतात. पर्यायाने शेतकऱ्याचे जीवनमान उंचावण्यास मदत होते. आंध्रप्रदेश या राज्यामध्ये अशा प्रकारच्या योजना राबवून शेतीचे उत्पन्न वाढविण्यावर भर दिला आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रात ठिबक सिंचन योजना राबविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जाईल.

श्री महादेव सहकारी पाणीपुरवठा संस्थेने राबविलेला ठिबक सिंचनाचा प्रकल्प हा राज्यासाठी दिशादर्शक असून याची अंमलबजावणी इतर जिल्ह्यातही करण्यावर भर देण्यात येईल, असे सांगून कृषि मंत्री दादाजी भुसे म्हणाले, खरीप हंगामाची आढावा बैठक ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली. या बैठकीत गावपातळीवरून खरीप हंगामाचे नियोजन कसे करता येईल यावर भर देण्यात आला आहे. यावर्षी वेधशाळेने चांगल्या प्रमाणात पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला असल्याने आगामी काळात खरीपाचे सुयोग्य नियोजन करण्यात येईल आणि त्याची योग्य पध्दतीने अंमलबजावणीही करण्यात येईल. सद्या कोरोनाचा प्रभाव पुन्हा वाढला असून अनेक ठिकाणी शासन, स्थानिक प्रशासन यांच्या मार्फत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. तथापी, कृषि क्षेत्राला यातून सूट देण्यात आली आहे. कृषि संबधित असलेले बी-बीयाणे, खते यांची दुकाने नियमितपणे सुरू राहणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी करावी.

शेतकऱ्याच्या शेतात बसून खरीप हंगामाच्या बैठकीची कृषि मंत्र्यांनी केली सांगता

राज्यस्तरीय खरीप हंगाम 2021 नियोजनपूर्व तयारी आढावा बैठक कोल्हापूर मध्ये आज ऑनलाईन पध्दतीने सकाळी सुरू करण्यात आली होती. या बैठकीचा समारोप कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी कृषिरत्न संजीव माने यांच्या शेतात बसून केला. यावेळी बैठकीच्या सांगता प्रसंगी ते म्हणाले, खरीप हंगाम नियोजनासाठी संबंधित सर्व घटकांचा यामध्ये समावेश करण्यात यावा. हंगामासाठी ज्या ज्या सूचना प्राप्त होतील त्या सर्व सूचनांचा विचार पुढील काळात करण्यात यावा. या सूचनांमध्ये विशेषत: कृषि पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांकडून येणाऱ्या सूचनांचा यामध्ये समावेश असावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

कृषि पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा सन्मान

कृषि मंत्री दादाजी भुसे, खासदार धैर्यशील माने यांच्याहस्ते कृषिरत्न संजीव माने, वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार प्राप्त प्रदीप पाटील व सुनील माने, वसंतराव नाईक सेंद्रीय शेती कृषिभूषण पुरस्कार प्राप्त सचिन येवले यांचा शाल, श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला.

यावेळी कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी सांगली इस्लामपूर रोडवरील कृषिदूत सेंद्रिय कृषि उत्पादनांच्या मॉलला भेट दिली. तसेच नागेश पांडुरंग देसाई या शेतकऱ्याच्या उन्हाळी सोयाबीन, ग्रामबीजोत्पादन प्रकल्पालाही भेट दिली.                    कृषिरत्न पुरस्कार प्राप्त संजीव माने यावेळी म्हणाले, गेली अनेक वर्षे शेतामध्ये काबाडकष्ट करून ऊस शेती जास्तीत जास्त फायदेशीर कशी होईल याबाबत संशोधन करून एकरी 150 टन उत्पादन घेण्यापर्यंत आम्ही यशस्वी झालो आहोत. आता 200 टनापर्यंत जाण्याचा आमचा मानस आहे. या आमच्या कामाची दखल घेवून महाराष्ट्र शासनाने कृषि विभागाचा कृषिरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देवून आमचा यथोचित गौरव केला त्याबद्दल मी शासनाचा मनपूर्वक आभारी आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close