सांगली

सातबाराचे संगणकीकरण, दुरूस्तीसाठी तालुकास्तरावर स्वतंत्र फेरफार नोंदणी कक्षांची स्थापना : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

ऑफलाईन अर्जांसाठी नागरिकांना संपर्क साधण्याचे आवाहन

सांगली  : महाराष्ट्र राज्य शासनाचा सातबारा संगणकीकरण अद्ययावत करणे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून राज्यातील सर्व हस्तलिखित सातबारा पूर्णपणे बंद करून ऑनलाईन सातबारा उपलब्ध करून देणे हे उद्दिष्ट आहे. हा महत्वाकांक्षी प्रकल्प जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी पालकमंत्री जयंत पाटील यांच्या निर्देशानुसार सातबारा संगणकीकरण अद्ययावतीकरणासाठी तालुकास्तरावर स्वतंत्र फेरफार (म्युटेशन) कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये 15 फेब्रुवारी ते 15 मार्च अखेर या कालावधीत विशेष मोहिम सुरू केली आहे. तरी ज्या नागरिकांची फेरफारसंबंधी ऑफलाईन प्रकरणे प्रलंबित असतील त्यांनी आपले अर्ज घेवून संबंधित तालुक्याच्या फेरफार कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
या मोहिमेंतर्गत तहसिलदार यांनी तालुकास्तरावर स्वतंत्र फेरफार कक्ष स्थापन करून त्यामध्ये प्रत्येकी एक डाटा ऑपरेटर, महसूल सहाय्यक, अव्वल कारकून यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच सदर कक्षात इंटरनेट, प्रिंटरची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कक्षांमध्ये प्रलंबित नोंदणीकृत नोंदी, वारस नोंदी, बँक बोजा, साठेखत इत्यादी, नोंदणीकृत /अनोंदणीकृत फेरफार नोंदीसाठी प्राप्त अर्ज स्वीकारले जातील. शासन नियमांनुसार कागदपत्रांची पुर्तता नागरिकांनी करावी. फेरफार कक्षातील नियुक्त कर्मचाऱ्यांना प्रशिक्षीत करण्यात आले आहे. या कक्षामध्ये प्राप्त होणाऱ्या अर्जांची नोंदणी/माहिती एनआयसी कडील सॉफ्टवेअर मध्ये तात्काळ करून सदरचे अर्ज संबंधित गावकामगार तलाठी यांच्याकडे त्यादिवशीच वर्ग करण्यात येणार आहेत. या मोहिमेंतर्गत करण्यात येणाऱ्या कार्यवाहीमध्ये तहसिलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांनी गांभीर्याने लक्ष घालून कामकाज करावे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close