सांगली

पलूस, कडेगाव तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांचा निपटारा करा : सहकार डॉ. विश्वजीत कदम

सांगली, दि. 22,  : तांत्रिक अडचणीमुळे दीर्घ काळ प्रलंबित राहिलेल्या विषयांसाठी सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. यावेळी त्यांनी पलूस, कडेगाव तालुक्यातील पुनर्वसनासह अन्य प्रलंबित विषयांच्या अनुषंगाने लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे, त्यामुळे प्रलंबित विषयांचा निपटारा तातडीने करावा, असे निर्देश यंत्रणांना दिले.
पलूस, कडेगाव तालुक्यातील विविध प्रलंबित विषयांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, अप्पर जिल्हाधिकारी गोपिचंद कदम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, उपवनसंरक्षक श्री. धानके यांच्यासह संबंधित सर्व यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.
कोयना अभयारण्य प्रकल्पग्रस्तांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्याबाबत सविस्तर चर्चा करताना राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, घरांची नुकसान भरपाई, गोठा बांधणे अनुदान रक्कम, शौचालय बांधणे अनुदान रक्कम, उदरनिर्वाह भत्ता आदिंबाबतचे प्रस्ताव यंत्रणांनी तात्काळ मंत्रालयस्तरावर सादर करावेत. त्यासाठी आपण व्यक्तीश: पाठपुरावा करू. ज्या खातेदार शेतकऱ्यांना 100 पैकी 80 गुंठे जमीनीचे वाटप झाले आहे व 20 गुंठे क्षेत्र उपलब्ध नसल्याने त्याबदल्यात खातेदारांना रक्कम मंजूर करण्याचे ठरले आहे. अशांसोबत विभागीय वन अधिकारी वन्यजीव आणि वनविभाग यांनी संबंधित लोकांशी तात्काळ बैठक घ्यावी व या विषयाचा निपटारा करावा असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच शिरसिंग व झाडोली या दोन वसाहती नगरपरिषद पलूस मध्ये समाविष्ट करण्याबाबत राज्य शासनाकडे तात्काळ प्रस्ताव सादर करण्याबाबतही त्यांनी निर्देशित केले. याशिवाय प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्याबाबत त्यांनी या बैठकीत चर्चा केली.
तासगाव-कराड राष्ट्रीय महामार्गाच्या तुपारी ते पाचवा मैल येथील रखडलेल्या कामामुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी असून रस्त्याच्या दुरावस्थेमुळे लोकांना प्रचंड त्रासही सहन करावा लागत आहे, असे सांगुन राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, या रस्त्याची त्वरीत सुधारणा करा, असे निर्देश देऊन यामध्ये काही तांत्रिकदृष्ट्या अडचण असल्यास त्याबाबत यंत्रणांनी वरिष्ठ स्तरावर चर्चा करावी व रस्ता सुस्थितीत करावा. कडेगाव तालुक्यातील सोनसळ येथील चौरंगीनाथ देवस्थानच्या कामांसाठी 1 कोटी 20 लाख रूपयांची प्रशासकीय मान्यता असून प्रस्तावित कामे त्वरीत पूर्ण करावीत, असे सांगून देवस्थानाला लागून असणाऱ्या कराड तालुक्यातील हद्दीत होत असणाऱ्या मायनिंगच्या कामामुळे धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. तसेच या परिसराच्या निसर्ग सौंदर्याला हानी पोहोचत आहे. याबाबत जिल्हाधिकारी सातारा यांच्याशी चर्चा करणार असल्याचे स्पष्ट केले.
विजापूर गुहागर महामार्गांतर्गत कडेगाव तालुक्यातील रखडलेल्या कामांबाबत चर्चा करत असताना नांदणी येथील पूल एप्रिल महिन्याअखेर तर येरळा येथील पूल मे महिन्याअखेर पूर्ण होईल असे यावेळी सांगण्यात आले. या बैठकीत सुखवाडी – तुंग पूलासाठी भूसंपादनाच्या मोबदल्यातील तफावतीबाबतही चर्चा करण्यात आली. नागठाणे येथील बालगंधर्व स्मारक कामकाजाचा सविस्तर आढावा घेत असताना स्मारकाच्या कामास लागलेला प्रचंड कालावधी हा अक्षम्य असून यंत्रणेने कडक धोरण स्वीकारावे व हे काम येत्या तीन महिन्यात पूर्ण करून घ्यावे. तोपर्यंत या कामाचा दर आठवड्याला प्रगती अहवाल सादर करावा, असे राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी निर्देशित केले.
पलूस तालुक्यातील अंकलखोप येथील सामाजिक न्याय भवन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्याच्या कामकाजाचा आढावा घेत असताना सामाजिक न्याय भवनाचे स्थापत्य काम पूर्ण झाले असून पुतळा समितीच्या मान्यतेसाठी सादर करावा, असे राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी निर्देशित केले. यासह पलूस तालुका क्रीडा संकुल, वांगी येथील तालुका क्रीडा संकुल, रामानंदनगर येथील रेल्वेलाईनवरील अतिक्रमीत लोकांना पर्यायी जागा देणे, शाळगाव येथील महावितरण सबस्टेशनसाठी जागा मागणी, तडसर येथे शासकीय धान्य गोदामाच्या जागेबाबत, पलूस व कडेगाव तालुक्यातील तहसील कार्यालयातील स्टाफिंग पॅटर्नबाबत आदि सर्व विषयांबाबत सविस्तर चर्चा केली व यंत्रणांना आवश्यक निर्देश दिले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close