सांगली

बर्ड फ्लू : व्यावसायिकांनी घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली जिल्ह्यात बर्ड फ्लू नमुना तपासणीत होकारार्थी नाही

सांगली, दि. 21 : बर्ड फ्लू रोगनिदानासाठी सांगली जिल्ह्यातून आजअखेर 16 नमुने पुणे येथील रोग अन्वेषण प्रयोगशाळेकडे सादर करण्यात आले होते. परंतु एकही नमुना बर्ड फ्लू साठी होकारार्थी आढळून आलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी व कुक्कुट व्यावसायिकांनी घाबरू नये व अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी व जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त सांगली यांनी केले आहे.
जिल्ह्यातील सर्व कुक्कुट पालक व्यावसायिकांनी पक्षीगृहामधील अथवा परसातील कोंबड्यामधील कोणत्याही प्रकारचा अनैसर्गिक मृत्यु अचानक मोठ्या प्रमाणावर झाल्यास प्रथम तशी सूचना ग्रामपंचायत अथवा जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यास तात्काळ द्यावी व त्यांच्यामार्फत मयत झालेल्या पक्ष्यांची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावावी, असे आवाहनही जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांनी केले आहे.
कवठेमहांकाळ तालुक्यातील मळणगाव येथे नुकत्याच कुक्कुटपक्ष्यांच्या मृत्यूच्या घटनेबाबत माहिती देताना जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त म्हणाले, कवठेमहांकाळ तालुक्यातील मळणगाव येथील अशोक धोंडिराम चव्हाण हे मागील 7 वर्षापासून मांसल कुक्कुट पक्षी संगोपनाचा व्यवसाय करतात. त्यांच्याकडे प्रत्येकी 5 हजार मांसल कुक्कुट पक्ष्यांचे संगोपन करता येईल अशा क्षमतेचे 2 शेडस् आहेत. श्री. चव्हाण यांनी सद्यस्थितीत एका खाजगी कंपनीबरोबर मांसल कुक्कुट पक्षी संगोपनाचा करार केला असून त्यांच्याकडे सध्या या करारामार्फत पक्ष्यांच्या 19 व्या तुकडीचे संगोपन चालू आहे. यापुर्वी सुध्दा अन्य एका खाजगी कंपनी सोबतही त्यांनी साधारणत: 3 वर्षाचा करार पूर्ण केलेला आहे. करार केलेल्या कंपनीकडून दि. 10 डिसेंबर 2020 रोजी एकूण 8 हजार 694 इतकी 1 दिवसीय पिल्ले प्राप्त झाली होती. कंपनी करारानुसार 2 ते 3 दिवसातून एकदा कंपनीकडील पर्यवेक्षक हे मार्गदर्शन करण्यासाठी तसेच लसीकरण व उपचारासाठी नियमितपणे पक्षीगृहास भेट देत असतात. या पक्ष्यांना आवश्यक ते सर्व लसीकरण करण्यात आलेले आहे.
सध्या श्री. चव्हाण यांच्याकडील पक्ष्यांचे वयोमान 41 दिवसांचे आहे. मागील 3 ते 4 दिवसांपासून काही पक्ष्यांमध्ये नाकातून घरघरण्याचा त्रास होत होता. त्यामुळे कंपनीकडील पर्यवेक्षकांमार्फत पक्ष्यांवर उपचार चालू होता. दि. 17 व 18 जानेवारी 2021 रेाजी एकूण 20 पक्षी मयत झाले होते. त्यानंतर दि. 19 जानेवारी 2021 रोजी कॉपल सल्फेट नावाचे औषध पक्ष्यांना पिण्याच्या पाण्यातून देण्यात आले होते. परंतु काही पक्ष्यांमध्ये औषधाची मात्रा जादा झाल्याने सदर दिवशी 24 पक्ष्यांचा मृत्यू झाला. असे एकूण 44 पक्षी पक्षीगृहात मयत झाले होते. दि. 10 डिसेंबर 2020 ते दि. 16 जानेवारी 2021 या कालावधीत या कळपामधील मयत झालेल्या एकूण 293 पिल्लांचा / पक्ष्यांचा श्री. चव्हाण यांनी योग्य रितीने विल्हेवाट लावले असल्याचे सांगितले. श्री. चव्हाण हे काही कारणास्तव आजारी असल्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या मुलाने दि. 17 ते 19 जानेवारी 2021 या कालावधीमधील मयत झालेले 44 पक्षी पक्षीगृहाबाहेर काढून कोणत्याही विभागाशी संपर्क न साधता उघड्यावर टाकून दिले. तथापि यांची माहिती कळताच श्री. चव्हाण यांनी गावाचे सरपंच यांच्या मदतीने जमिनीमध्ये खोल खड्यामध्ये मयत पक्षी पुरून टाकले व परिसरात जंतुनाशकाची फवारणी केली.
याबाबतची माहिती मिळताच जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त सांगली डॉ. धकाते तसेच जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद सांगली डॉ. पराग, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. बेडक्याळे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन तालुका लघुपशुवैद्यकिय सर्व चिकित्सालय कवठेमहांकाळ डॉ. ढगे, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती कवठेमहांकाळ डॉ. पाटील, पशुधन पर्यवेक्षक श्री. कोरे यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष भेट दिली. श्री. चव्हाण यांच्या पक्षीगृहातील कोंबड्यांची पाहणी केली असता पक्षी तंदुरूस्त असल्याचे निदर्शनास आले. तथापि काही पक्ष्यांना सर्दीसारखी लक्षणे असल्याचे आढळून आले. त्यांना औषधोपचार करण्या8त आले व पुढील उपचाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. बर्ड फ्लू अथवा बर्ड फ्लू सदृश्य रोगाची कोणतीही लक्षणे कळपामध्ये आढळून आलेली नाहीत अथवा या पक्ष्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अनैसर्गिक मृत्यूही झालेला नसल्याचे निदर्शनास आले. मांसल कुक्कुट पक्ष्यांमध्ये दररोज किमान 0.1 ते 0.3 टक्के इतकी मरतूक नियमितपणे होत असते. त्यामुळे यामध्ये घाबरण्यासारखे कोणतेही कारण नाही. तसेच यापुढे भविष्यात अशा प्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत श्री. चव्हाण यांना सक्त ताकीद देण्यात आली आहे. मयत कोंबड्यांची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावण्यासाठी इन्सीनरेटर अथवा टाकीच्या आकाराचा खोल खड्डा बांधणे यासारख्या बाबी पुणे करणे संदर्भात श्री. चव्हाण यांना सूचना देण्यात आलेल्या असून सदर पक्षीगृह नोंदणीकृत नसल्याने तात्काळ त्याची नोंदणी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, सांगली कार्यालयात करण्याबबात सूचित केले असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, सांगली (मुख्यालय-मिरज) यांनी सांगितले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close