ताज्या घडामोडी

एकही बालक पोलिओ लसीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या : प्रभारी जिल्हाधिकारी गोपीचंद कदम

कोविड-19 प्रादुर्भावाच्या अनुषंगाने आवश्यक खबरदारी घ्या

सांगली : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 17 जानेवारी 2021 रोजी राबविण्यात येत असून लसीकरणापासून कोणतेही बालक वंचित राहणार नाही यासाठी सर्वोतोपरी दक्षता घ्या. कोविड-19 प्रादुर्भावाच्या अनुषंगाने आवश्यक खबरदारी घेऊन व सर्व नियमांचे काटेकोर पालन करून पल्स पोलिओ लसीकरण मोहिम यशस्वीपणे पार पाडावी, असे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी दिले.
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा समन्वय समितीची सभा प्रभारी ü जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, प्र. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल आंबोळे, डॉ. एस नाईकवाडे यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधीक्षक उपस्थित होते.
दुर्गम गावे, वाड्या वस्त्या, स्थलांतरीत कुटुंबे यातील 0 ते 5 वयोगटातील कोणतेही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहणार नाही यासाठी यंत्रणांनी काटेकोर नियोजन करावे. कोविड-19 प्रादुर्भावाच्या अनुषंगाने सर्व बुथवर आवश्यक ती दक्षता घ्यावी. बुथवर गर्दी होऊ नये, सोशल डिस्टन्सिंगचे नियमांचे पालन आदि बाबींबाबत दक्ष रहावे. सॅनिटायझेशन, थर्मल गन आदि आवश्यक साहित्याची कमतरता भासू नये यासाठी खबरदारी घ्यावी. नियुक्त कर्मचाऱ्यांना लसीकरण प्रशिक्षणाबरोबरच कोविड-19 च्या अनुषंगानेही प्रशिक्षण द्यावे. लसीकरण मोहिमेबाबत जनजागृती करावी, असे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी दिले.
जिल्ह्यात ग्रामीण, शहरी, महानगरपालिका क्षेत्रात 0 ते 5 वयोगटातील 2 लाख 46 हजार 641 बालके असून त्यांच्या लसीकरणासाठी 2720 बुथ लावण्यात येणार आहेत. लाभार्थींना 2 कि.मी. पेक्षा जास्त अंतर चालत जावे लागणार नाही याची दक्षता घेऊन बुथची स्थापना करण्यात आली आहे. 100 पर्यंत लाभार्थी असलेल्या बुथवर दोन, 100 ते 150 पर्यंत लाभार्थी असलेल्या बुथवर तीन व 150 वरील लाभार्थी असलेल्या बुथचे विभाजन करून 100 ते 125 लाभार्थीचे बुथ करण्यात येत असून प्रत्येक बुथवर दोन ते तीन कर्मचारी नेमणूक करण्यात येणार आहे. दिनांक 17 जानेवारी रोजी होणाऱ्या लसीकरणादिवशी सर्व बालकांना लस मिळावी यासाठी 979 ट्रान्झिट टीम दिवसभर कार्यरत राहणार असून या टीम जिल्ह्याच्या सर्व सीमा, नाके, एसटी स्टॅण्ड, रेल्वेस्थानके, टोलनाके आदि ठिकाणी कार्यरत राहून लसीकरण करणार आहेत. याबरोबरच बांधकामांची ठिकाणे, रस्त्यांची कामे, खाण कामगार, ऊसतोड कामगार, विटभट्या, मंदिरे, बगीचे, फुटपाथवरील लाभार्थी, तात्पुरत्या व फिरत्या वसाहती, फिरस्ते, प्रसुतीगृहे, खाजगी दवाखाने, तुरळक वाड्या वस्त्या इत्यादी ठिकाणच्या बालकांच्या लसीकरणासाठी 209 मोबाईल टीमची स्थापना करण्यात आली आहे.
दि. 18 जानेवारी 2016 नंतर जन्मलेल्या सर्व बालकांची नोंदणी करण्यात येत असून नोंदणी झालेल्या बालकांना बुथचे ठिकाण व लसीकरणाचा दिनांक असलेल्या स्लीपचे वाटप करण्यात येत आहे. लसीकरणासाठी 2720 बुथवर लस पाजक, लेखनिक व केंद्र प्रमुख अशा 5440 व्यक्ती व स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत 2 लाख 46 हजार 641 लाभार्थी बालकांसाठी आवश्यक पोलीओ लस शितसाखळी अबाधित राखून 3 लाख 13 हजार 240 डोस लस वाटप करण्यात येणार आहे. अशी माहिती या बैठकीत देण्यात आली.
यावेळी प्र. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे यांनी कोरोना लसीकरण मोहिमेबाबत सविस्तर माहिती दिली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close