भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्राची कौतुकास्पद कामगिरी
वैद्यकीय अधिकारी डॉ.विश्वास धेंडे यांनी वाचविला एकाचा जीव
भिलवडी : भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा फायदा भिलवडी व परिसरातील १९ गावांना होत आहे. नुकतेच भिलवडी येथील एका अत्यवस्थ रुग्णावर तात्काळ उपचार करून त्याचे प्राण वाचविल्यामुळे वैद्यकीय अधिकारी डॉ.विश्वास धेंडे यांचे व कर्मचारी यांचे भिलवडी परिसरातून कौतुक होत आहे.
सरकारी दवाखान्यात रूग्णांवरती तात्काळ उपचार होत नाहीत. तसेच दाखल करण्यात आलेल्या रूग्णांच्या जिवीताविषयी शाश्वती नसते.असा गैरसमज लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात पसरल्यामुळे अनेक वेळा लोक सरकारी दवाखाण्याकडे पाठ फिरवून खासगी दवाखाण्या मार्ग धरतात. परंतु सरकारी दवाखाण्यात देखील तात्काळ व योग्य उपचार केले जातात, याची प्रचिती भिलवडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आली.भिलवडी पंचशील नगर येथील एका व्यक्तीला अस्वस्थ वाटू लागले होते.काही वेळाने सदर व्यक्ती बेशुद्ध पडली.बेशुध्द अवस्थेतच त्यांना भिलवडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आणले गेले. सदर व्यक्तीच्या शरिरातील आॅक्सिजन लेवल,पल्स व रक्तदाब मोठ्या प्रमाणात कमी झाला होता. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.विश्वास धेंडे, डॉ. संदीप गोरड व त्यांच्या सहकाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करीत सदर रूग्णावर प्राथमिक उपचार करून त्याला शुध्दीवर आणले.यानंतर त्याला पुढील उपचारासाठी सांगली येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले.
भिलवडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या वैद्यकीय सेवेतील अनुभवाच्या जोरावर सदर रूग्णांवरती तात्काळ व योग्य उपचार केल्यामुळे सदर रूग्णांचे प्राण वाचले आहेत. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.विश्वास धेंडे व त्यांच्या सहकाऱ्यांचे परिसरातून कौतुक होत आहे.