ताज्या घडामोडी

बाबासाहेबांच्या विचारांसाठी सदानंद फुलझेले यांनी आपले आयुष्य वेचले : न्यायमूर्ती भूषण गवई

स्मारक समितीमार्फत तैलचित्राचे अनावरण

नागपूर, दि. 01 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे दिवंगत सचिव सदानंद फुलझेले यांना गेल्या अनेक वर्षांपासून ओळखतो. आंबेडकरी चळवळीत अग्रेसर असणारे ते ज्येष्ठ कार्यकर्ते होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्यावर धम्मक्रांतीचे विचार रुजवण्याची जबाबदारी दिली होती. त्यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले. दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील दादासाहेब कुंभारे सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे दिवंगत सचिव सदानंद फुलझेले यांच्या तैलचित्राचे अनावरण त्यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी खासदार कृपाल तुमाने, महापौर संदीप जोशी, माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे, अॅड. राजेंद्र गवई, स्मारक समितीचे सचिव डॉ. सुधीर फुलझेले, भदंत नागार्जुन सुरई ससाई व विलास गजघाटे उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानुसार बौद्ध धम्माच्या सामाजिक उन्नती, विकासासाठी आणि कार्यासाठी त्यांनी जन्मभर स्वत:ला वाहून घेतले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पुढे नेण्याचे कार्य त्यांनी केले. समता, न्याय, बंधुता आणि स्वातंत्र्य हे लोकशाहीचे चार प्रमुख स्तंभ असून, डॉ. आंबेडकरांचे आदर्श विचार समाजात अजून पुढे नेण्याची सामूहिक जबाबदारी आहे. त्यानुसार भारतीय नागरिक म्हणून सर्वांनी प्रयत्नरत राहिले पाहिजे.
कोरोनाकाळात लॉकडाऊनमुळे त्यांच्या अंत्यसंस्काराला येऊ शकलो नाही, ही खंत होती. मात्र आज त्यांच्या तैलचित्राचे अनावरण करता आले, असे सांगून दिवंगत सचिव सदानंद फुलझेले यांच्या जीवनाचा, त्यागाचा आदर्श आपल्या समोर ठेवून काम करावे,असेही न्यायमूर्तींनी सांगितले.
खासदार कृपाल तुमाने यांनीही त्यांना यावेळी अभिवादन केले. ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा परीसस्पर्श स्मारक समितीचे दिवंगत सचिव सदानंद फुलझेले यांना लाभला. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून प्रेरणा घेत बौद्ध धम्म, त्यांचे विचार पुढे नेण्यासाठी अहोरात्र काम केले. समाजाप्रती आणि दीक्षाभूमीच्या विकासासाठी समर्पण भावनेतून झटत राहिले.
महापौर संदीप जोशी यांनी समितीचे माजी सचिव सदानंद फुलझेले यांच्या रुपाने दीक्षाभूमीच्या विचार व विकासासाठी झटणारे व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले ,अशा शब्दांत अभिवादन केले. नागपूर महानगरपालिकेत उप महापौर असताना त्यांनी शहराच्या विकासात मोठे काम केले आहे. त्यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
रिपब्लिकन चळवळीने पाच वर्षात दादासाहेब आणि सदानंद फुलझेले यांच्या रुपाने दोन नेते गमावले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1956 साली नागपूर येथील दीक्षाभूमीवर धम्मक्रांती केली. त्यानंतर त्याच ठिकाणी जगातील भव्य स्मारक नागपुरात स्थापन करण्यात आले, असे डॉ. राजेंद्र गवई यांनी आपल्या मनोगतात सांगितले.

समर्पणाच्या भावनेने काम करण्याचा उत्तम परिपाठ सदानंद फुलझेले यांनी त्यांच्या कार्यातून सर्वांसमोर घालून दिला आहे. दीक्षाभूमीच्या विकासासाठी, प्रगतीसाठी संपूर्ण आयुष्य वेचले, असे माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी अभिवादनपर भाषणात व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सहवास त्यांना लाभला. दीक्षाभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांती आणि दीक्षेचा यशस्वी कार्यक्रम सदानंद फुलझेले यांच्या नेतृत्वात पूर्ण झाला, असे प्रा. कवाडे म्हणाले.
यावेळी भदंत सुरई ससाई यांचेही समयोचित भाषण झाले. प्रास्ताविकात विलास गजघाटे यांनी सदानंद फुलझेले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन. आर. सुटे यांनी केले तर स्मारक समितीचे सचिव डॉ. सुधीर फुलझेले यांनी आभार मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close