ताज्या घडामोडी

डोंगरावरचा पाऊस..!

माझी पहिली शाळा जि. प.शाळा ढोकळवाडी गावापासून दूर उंचावर आणि मोकळ्या माळावर होती.ती द्विशिक्षकी दोन पत्र्याच्या खोल्या असणारी .जोरात वारा सुटला की शाळेच्या वरचा पत्रा हालत असे. कधी काळी वादळी वाऱ्यात शाळेचा पत्रा उडून गेला होता.त्यामुळे काही महिने शाळा गावातल्या मारुतीच्या मंदिरात भरवली जायची हे तेथील गावकाऱ्यांकडून मला समजले .नवीन बसवलेला पत्रा परत उडून जाऊ नये म्हणून त्यावर मोठे मोठे दगड ठेवले होते. जोरात वारा आला की वरचे दगड हालत असल्यासारखे वाटायचे.पण आम्ही शिक्षक आणि शाळेतील मुले आपआपल्या कामात दंग असायचो.मुले खूप काटक आणि खूपच धाडशी होती.शेत, ओढा, डोंगर, झाडेवेली, पिके, प्राणी, पक्षी यांची त्यांना बरीसची माहिती होती. सुट्टी दिवशी मुले आईवडिलांच्या सोबत शेतात जायची, त्यांना शेतीच्या कामात मदत करायची, काही मुलांना शेळ्या, म्हैशी चरायला घेऊन जावे लागायचे.

दुष्काळी तालुका, पावसाच्या भरवश्यावर पिकणारी शेती त्यामुळे साहजिकच तिथल्या लोकांना जगण्यासाठी खूप संघर्ष करावा लागायचा. गावातील अनेक लोक कामाच्या शोधात शहरी भागात जाऊन मिळेल ती कामे करायची. गावाकडेच कुटूंब आसल्याने चार सहा महिन्यातून दिवाळी सणाला आणि गावच्या जत्रेला ती गावाकडे यायची. इतर वेळी सुनासुना वाटणारा गाव तेंव्हा मात्र माणसांच्या गर्दीने फुलून जायचा.गावात एक नवचैतन्य यायच. शाळेच्या समोरून थोड्या अंतरावर उभे असलेले डोंगर दिसायचे. पावसाळ्यात ढग त्या डोंगरांना चिकटल्यासारखे वाटायचे.कापूस पिंजल्यासारखे ढग आणि निळे डोंगर खूपच सुंदर दिसायचे.डोंगरावर उभ्या असणाऱ्या पवनचक्क्या साजशृंगार केलेल्या नवयुवतीच्या केसात माळलेल्या फुलासारख्या दिसायच्या.जेंव्हा पाऊस सुरू व्हायचा तेंव्हा मी आणि शाळेतील मुले त्या डोंगरावर पडणाऱ्या पावसाचे निरीक्षण बाहेरच्या कट्ट्यावरूनच करायचो.केसांची एकच लांब बट, सावल्या रंगाचा, नाकात सतत पाण्याची धार वाहनारा,बऱ्याच वेळा त्याच्या शर्टाची बटणं तुटलेली बालाजी जवळ यायचा.”अरे बालाजी तू बटणे का नाही लावलीस?”असं विचारताच तो लगेच म्हणायचा “सुरपारंब्या खेळताना झाडात अडकून तुटली .”तिकडं बघा मॅडम. त्यो डोंगर दिसतोय कीन्हीं तिथंच आम्ही सुट्टीच्या दिवशी शेळ्या करडं घेऊन जातो. तिथं चिंचेच झाड हाय ,म्या आणि माझा भाऊ सभ्यानं एकदा लई चिंचा गोळा केल्या होत्या. तिथं झाडावर चिमणीचं खोपं पण होतं. छोटी पिल्ले होती त्यात, मी झाडावर चिंचा काढायला चढल्यावर बघितलं.ती चिवचिव करीत व्हती, आणि मोठी चिमणी त्यासनी चोचीत दाणे घालत होती. तिथं कारी बोरांची झाडं पण हायती,पिकली की लई गोड लागत्याती.”.मी या छोट्या रानंपाखराचं बोलणं मन लावून ऐकत होते. कारी बोरं कसली आसतात हे मलाही माहीत नव्हतं.मी त्याला म्हणाले”कसली आसतात रें कारी बोरं.?तो लगेच म्हणाला” म्या रविवारी शेळ्या चरायला नेल्या की तुम्हांसनी बोरं घेऊन येतो.”मी त्याला म्हणाले “नको रे काट्याकुट्यात जाऊ, पाहता येईल कधीतरी.”थोड्या वेळाने धो धो पावसाला सुरुवात व्हायची.मुले आनंदाने उड्या मारायची.” येरे येरे पावसा तुला देतो पैसा,पाऊस आला मोठा पैसा झाला खोटा.”म्हणत ती गोल गोल गिरक्या घ्यायची. त्यांच्याकडे पाहून मलाही माझं बालपण आठवायचं.मी ही त्याच्यासोबत लहान होऊन जायचे. तेवढ्यात साक्षी जाधव दुसरीत शिकणारी मुलगी जवळ यायची.ती आजी आजोबा सोबत एकटीच गावी राहत असे. आई वडील भांवडं मुंबईत रहात होती. सावल्या रंगाची,, गुबऱ्या गालाची,टपोऱ्या डोळ्याची, प्रत्येय गोष्ट जाणून घेणारी ती म्हणायची.” मला पण येतंय पावसाचं गाणं,मी म्हणू का?आजीनं शिकवलय तिच्या शाळेतले गाणं.”मी म्हणायचे” म्हण ना”.

पाऊस आला संवगड्यानू जलधारा पडती,
रिमझिम जलधारा, जलधारा पडती.
तिचा आवाज इतका गोड होता की नुसतं ऐकत राहावं असं वाटायचं.
मोठा पाऊस असला की डोंगरावरून वहात येणारे छोटे छोटे ओहोळ लांबून दिसायचे. तेच पाणी बंधाऱ्यात साठायचे.शाळेजवळ केलेल्या छोट्या तळ्यातही पाणी काही दिवस साठून राहायचे. पाणी आडवा, पाणी जिरवा ,ही मोहीम काय आहे?किंवा परिसर अभ्यासातील बरेच घटक ही मुले प्रत्यक्ष अनुभवातून शिकायची.

बालाजी सोमवारी मी येण्याची वाट पाहत बसायचा. माझी गाडी दिसताच सुसाट वेगाने माझ्याजवळ यायचा.शाळेत लावलेल्या शर्टाची बटणं परत तुटलेली असायची. पोटाची डेरी मोकळीच खाकी चड्डीचे दोन्ही किसे भरलेले. ती ओझ्याने खाली घसरत असायची. दोन्ही हातानी वर ओढत तो मी वर्गात जाण्याची वाटच ,”तो लगेच म्हणायचा .”आज तुम्हांसनी काय आणलंय ओळखा बरं ,कारी बोरं म्हणत खिश्यातील बोरं टेबलावर ठेवायचा, दुसऱ्या खिश्यातल्या थोड्याचं चिंचा तो मला देऊ करायचा.कारण दिवसभर मुलं “आम्हाला पण दे की एक चिंचेचं बुटुक म्हणून मागे लागायची, आणि तो उगीच पुढे पाळायचा.त्यात त्याला वेगळा आनंद मिळायचा.दिवसभर वर्गात त्याचा रुबाब वेगळाच असायचा .तो चिंचेच्या बदल्यात पेन्शील घ्यायचा.त्यांनी आणलेली कारी बोरे फारच छान होती.पिवळ्या रंगाची बोरे कच्ची आसताना तुरट लागायची. आणि पिकल्यावर गोड लागायची. त्या बोरांची चव आजूनही माझ्या जिभेवर रेंगाळते आहे.

कालांतराने माझी बदली दुसऱ्या शाळेत झाली पण त्यानंतर कारी बोरं मला कुठेच दिसली नाहीत. आणि तिथली रानावनात फिरणारी रानपाखरही नेहमीच माझ्या आठवणीत राहिली.

@

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close