ताज्या घडामोडी

गांधींच्या लोकसहभागातून संवादाचा अवलंब भारत सरकारने केला : संतोष अजमेरा

पुणे, दि: १८:भारत सरकारने कोविड काळात जनतेला सोबत घेऊन केलेले काम, स्वच्छ भारत चळवळीत घ्यायला सांगितलेली भूमिका, उज्ज्वला योजनेमध्ये आपली सवलत सोडून देण्याचे केलेले आवाहन हे गांधींच्या लोकसहभागातून संवादाचाच अवलंब आहे,असे आजच्या काळात लोकसहभागातून संवाद या माध्यमाचा वापर कुठे दिसतो, या प्रश्नाला उत्तर देताना वरिष्ठ केंद्र सरकारी अधिकारी संतोष अजमेरा यांनी सांगितले.
गांधी जयंतीच्या निमित्ताने सुरु झालेल्या वेबीथॉन अर्थात सलग ४८ दिवस चालणाऱ्या वेबिनार मालिकेमध्ये ‘गांधी: एक संवादकर्ता’ या विषयावर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक लोक संपर्क ब्यूरोचे संचालक, संतोष अजमेरा यांनी आज आपले विचार मांडले; हा त्यांच्या संशोधनाचा विषय राहिला आहे. संतोष अजमेरा हे भारतीय माहिती सेवेचे वरिष्ठ अधिकारी असून राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियानाची विशेष जबाबदारी देखील त्यांना सोपविण्यात आली आहे.

विषयाच्या सुरुवातीलाच संज्ञापनाबाबत काही भ्रम असल्याचे त्यांनी सांगितले. एका चांगल्या संवादकर्त्याला सर्व संवाद माध्यमांचा वापर, चांगले दिसणे, चांगले संवाद कौशल्य असणे, तसेच भाषेवर प्रभुत्व असण्याची गरज असते, असे काही भ्रम आपण सांभाळत असतो. गांधींसारखा संवादकर्ता या सर्व गोष्टींच्या विरुद्ध असल्याचे लक्षात येते. आपण वक्ता व संवादकर्ता यामधला फरक विसरतो. वक्ता हा एकमार्गी बोलत असतो, तर संवादकर्ता दोन्ही बाजूने होणाऱ्या संवादाला अनुरूप असतो, असे संतोष अजमेरा यांनी यावेळी नमूद केले.

आजच्या काळातील माध्यमांविषयी बोलताना ते म्हणाले, की आज प्रत्येक व्यक्ती प्रसारणकर्ता आहे, जी जगभरात पोहचू शकते; पण आपण खरेच संवाद साधत आहोत का, हे तपासण्याची गरज आहे. महात्मा गांधींच्या काळातील माध्यमे मर्यादित होती, वर्तमानपत्रेच प्रमुख माध्यम होते, जे सर्व ठिकाणी पोहचू शकत नव्हते. प्रत्यक्ष क्षेत्रीय संवाद, लोककला हे लोकांपर्यंत पोहचण्याचे माध्यम होते, अशा सर्व परिस्थितीमध्ये गांधी तळागाळात संवाद साधू शकले, यावरून ते संवादकर्ता म्हणून कसे होते याचा अंदाज आपण बंधू शकतो, हे अजमेरा यांनी लक्षात आणून दिले. गांधींचे संज्ञापन प्रभावी कशामुळे होते हे सांगताना अजमेरा यांनी सांगितले, की संदेश देणारा, प्रत्यक्ष संदेश, कुठून संदेश दिला गेला, अधिकाधिक लोकांपर्यंत संदेश कसा पोहचेल, अपेक्षितरित्या संदेश पोहचेल का, यावर प्रभावी संज्ञापन अवलंबून असल्याचे त्यांनी सांगितले. लाजाळू स्वभावाचे गांधी आपल्या शब्दांबाबत फार काटेकोर होते, ज्यांच्याशी संवाद साधायचा त्या सामान्य नागरिकाप्रमाणे राहणीमान, देशभ्रमंती-ज्यातून देशाचा स्वभाव-संस्कृती कळाली, साधी भाषा, बोलण्यात आणि कृतीमध्ये एकवाक्यता होती, लोकांमध्ये जाऊन संवाद साधायला हवा या मताचे गांधी होते आणि त्यांनी लोकांचा विश्वास मिळविला होता. साधा आणि थेट संदेश, समाजाबद्दलचा संदेश, लोकांचा सहभाग, आपल्या संवादावर लेखन करून गांधी प्रकाशित करून घेत असत. चालणे, उपवास, प्रार्थना, सूत कातणे, सत्याग्रह अशी गांधींची शब्दांविना संवाद माध्यमे होती, त्यांचा कुठलाही वैयक्तिक छुपा हेतू नव्हता, त्यांचे आयुष्य म्हणजे त्यांचा संदेश होता, ज्यातून त्यांना खूप मोठा जनसहभाग मिळला, असे संतोष अजमेरा यांनी सांगितले.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे प्रादेशिक लोक संपर्क ब्यूरो (महाराष्ट्र व गोवा विभाग), तसेच राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने या वेबीथॉनचे आयोजन केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close