ताज्या घडामोडी

प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरो तर्फे विविध माध्यमातून जनजागृती कार्यक्रमांना सुरुवात

पुणे : प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरो (महाराष्ट्र व गोवा विभाग), पुणे यांनी आज विविध माध्यमातून जनजागृती कार्यक्रमांना सुरुवात केली. पॉडकास्ट, जिंगल्स, चित्रकला व घोषणा स्पर्धा या माध्यमातून ‘कोविड योग्य वर्तन’ विषयी लोकजागर करण्यात येणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या, पश्चिम विभागाचे महासंचालक मनीष देसाई यांच्या हस्ते या सर्व कार्यक्रमांचे औपचारिक उद्घाटन आज आभासी पद्धतीने करण्यात आले.

याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना महासंचालक देसाई म्हणाले की, टाळेबंदीमध्ये पंतप्रधानांच्या ‘डिजिटल इंडिया’ या पूर्वीच्या आवाहनानुसार डिजिटल माध्यमांचा वापर करून विभागाने जनजागृतीचे काम केले. आज पंतप्रधानांनी सुरू केलेले जनआंदोलन पुढे नेणे म्हणजे केवळ प्रचार, प्रसिद्धी साहित्य वापरणे नव्हे, तर पंतप्रधानांचा मानस हे एक जनतेचे अभियान व्हावे, असा आहे. त्याचाच भाग म्हणून त्रिसूत्री संकल्प शपथ आज सर्व सरकारी कार्यालयांमध्ये घेण्यात आली. हाताची स्वच्छता, मास्क व शारीरिक अंतर या त्रिसूत्रीचा अवलंब करण्याचा संकल्प यानिमित्ताने करण्यात आला.

आताशा बर्‍याच लोकांमध्ये कोविड बद्दलचे गांभीर्य कमी झालेले दिसते, या साध्याश्या त्रिसूत्रीचे पालन देखील होताना दिसत नाही. योद्ध्यांना जसे चिलखत घालून लढणे आवश्यक असते, तसेच आपण देखील ही तीन संरक्षक कवचे बाळगायला हवीत, असे देसाई यांनी यावेळी संगितले. याविषयीची जनजागृती करणे आवश्यक झाले असून, प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरो कडून तो होत आहे, मनोरंजनातून प्रबोधनामध्ये विभागाचे कलाकार माहिर असल्याचे त्यांनी नमूद केले. देशभरातील प्रभावी व्यक्तिमत्वे देशाच्या नागरिकांना अपील करत आहेत, केंद्र सरकारचे सर्व माध्यम विभाग राज्याच्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियानाला प्रभावीपणे राबवित आहेत, याबद्दल त्यांनी माहिती दिली. प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरो, पुणे ‘पॉडकास्ट’ वाहिनी सुरू करणारा देशातील पहिलाच ब्यूरो आहे, याचे महासंचालक देसाई यांनी कौतुक केले व पुढील काळात कशाप्रकारे जनजागृती होऊ शकते, याविषयी मार्गदर्शन केले.

प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरो, पुणेचे संचालक संतोष अजमेरा यांनी ‘पॉडकास्ट’ बद्दल अधिक माहिती देताना संगितले की, ‘पॉडकास्ट’ म्हणजे श्राव्य माध्यमातून प्रसारित केली जाणारी लघु संवाद नाटिका आहे. प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरो, पुणे ‘पॉडकास्ट’ सुरू करणारा देशातील पहिला लोकसंपर्क ब्यूरो आहे. तंत्रज्ञान व फिल्ड पब्लिसिटीचा उत्तम मेळ यात साधला गेला असल्याचे त्यांनी नमूद केले. अनेक भागांची ही मालिका असून यातून कोविड काळात कशाप्रकारे आपले वर्तन असायला हवे, याविषयीची जागृती मनोरंजनातून केली जाणार आहे. ‘जन-जन की बातें’, असे या पॉडकास्ट वाहिनीचे नाव असून, ‘समझे क्या महाराज!’ नावाने हिंदी भाषेत ही मालिका प्रसारित होणार आहे.
यासोबतच मराठी तसेच हिंदी जिंगल्स सर्व प्रकारच्या श्राव्य माध्यमातून प्रसारित केल्या जाणार आहेत.
याशिवाय ‘चलो कोरोना से लड़े’ ही चित्रकला व घोषणा स्पर्धा देखील ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे. ‘कोविड काळातील योग्य वर्तन’ व ‘सणांच्या काळातील सामाजिक वर्तन’ या विषयांवर आधारित या स्पर्धा आहेत. दिनांक 21 ऑक्टोबर 2020, सकाळी 11 पर्यंत स्पर्धकांनी आपले चित्र किंवा घोषणा ऑनलाइन देणे अपेक्षित आहे. या स्पर्धेविषयीच्या सर्व सूचना प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरोच्या फेसबुक अकाऊंटवर उपलब्ध आहेत.

कोरोना योद्ध्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणार्‍या प्रेरणा गीताचे देखील यावेळी महासंचालक मनीष देसाई यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. या गीताच्या निर्मितीमध्ये प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरो, पुणेच्या कलाकार व कर्मचार्‍यांचा सहभाग आहे.
प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरोचे व्यवस्थापक डॉ जितेंद्र पानपाटील यांनी आपल्या प्रस्ताविकातून या सर्व कार्यक्रम निर्मितीमागची पार्श्वभूमी सांगितली. क्षेत्रीय लोकसंपर्क ब्यूरो, नाशिकचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी पराग मांडले यांनी अभारप्रदर्शन केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close