सांगली

कोरोना : तपासण्यांची क्षमता वाढवून अहवाल येण्याचा कालावधी कमी होणार : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

लवकर निदान होऊन रूग्णांना तात्काळ उपचाराखाली आणण्यासाठी
जिल्ह्यात आजअखेर 80 हजाराहून अधिक आरटीपीसीआर व ॲन्टिजन टेस्ट

सांगली, दि. 31 : कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. 50 वर्षावरील कोमॉर्बिड असणाऱ्या नागरिकांचा सर्व्हे करून आरटीपीसीआर, रॅपीड अँटीजन टेस्ट घेण्यात येत आहेत. लवकर निदान होऊन रूग्णांना तात्काळ उपचाराखाली आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. आजअखेर व्ही.आर.डी.एल लॅबमध्ये एकूण 56 हजार 442 टेस्टस यामध्ये शासकीय लॅबमध्ये 54 हजार 584 व खाजगी लॅबमध्ये 1 हजार 858 आर.टी.पी.सी.आर चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी 9 हजार 588 (शासकीय लॅबमध्ये 8 हजार 811, खाजगी लॅबमध्ये 777) पॉझिटीव्ह अहवाल आले आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यात आजअखेर 24 हजार 15 ॲन्टिजन टेस्ट्स करण्यात आल्या असून त्यापेक्‌ी 3 हजार 579 पॉझिटीव्ह अहवाल आले आहेत. जिल्ह्यात आर.टी.पी.सी.आर. व ॲन्टिजन टेस्ट अशा एकूण 80 हजार 457 टेस्ट्स करण्यात आल्या असून एकूण 13 हजार 167 (रिपीट टेस्टसह) पॉझिटीव्ह अहवाल आहे आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, कोविड-19 पॉझिटीव्ह रूग्णांचे निदान जलदगतीने होण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार दि. 20 जुलै पासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज कोविड रूग्णालय, सिव्हील हॉस्पीटल सांगली व सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रामध्ये आणि 7 ऑगस्ट पासून ग्रामीण भागामध्ये ॲन्टिजन टेस्टचा वापर सुरू करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील / शहरातील इतर 13 खाजगी हॉस्पिटल्स आणि 14 खाजगी पॅथॉलॉजी प्रयोगशाळांनासुध्दा ॲन्टिजन टेस्ट करण्याची परवानगी देण्यात आली असून त्यांच्यामार्फतही तपासणी सुरू आहे.
सांगली जिल्ह्यात पहिला रूग्ण 22 मार्च रोजी इस्लामपूर शहरात सापडला त्यावेळेस रूग्णांचे व नातेवाईकांचे थ्रोट स्वॅब नमुने तपासण्याची सोय सांगली शहरात उपलब्ध नव्हती. थ्रोट स्वॅब नमुने राष्ट्रीय विषाणु संस्था (NIV) पुणे येथे तपासणीस पाठविण्यात येत होते. दि. 1 एप्रिल रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज (कोविड हॉस्पीटल) येथे विलगीकरण कक्षातील रूग्णांचे व संस्था अलगीकरण कक्षातील व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणी करण्यासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा (VRDL) कार्यान्वीत करण्यात आली तेंव्हापासून संपूर्ण जिल्ह्यातील थ्रोट स्वॅब तपासणी या प्रयोगशाळेत करण्यात येत आहे. सुरूवातीस या लॅबची तपासणी क्षमता 150 टेस्ट्स प्रति दिन होती. ती सद्यस्थितीत 700 टेस्ट्स प्रति दिन पर्यंत वाढविण्यात आली आहे. वाढीव टेस्टच्या क्षमतेसाठी व्हीआरडीएल लॅबमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी स्वरूपात 10 प्रयोगशाळा तंत्रज्ञ व 05 डेटा एन्ट्री ऑपरेटरची पदे भरण्यात आलेली आहेत. रोटरी क्लब ऑफ सांगली मार्फत या प्रयोगशाळेस 01 अत्याधुनिक आरटीपीसीआर मशिन भेट दिले आहे. त्यामुळे व्ही.आर.डी.एल. लॅबमध्ये सध्या 03 आर.टी.पी.सी.आर. मशिन्स कार्यरत आहेत. मेट्रोपॉलिस खाजगी लॅब मार्फत दि. 20 एप्रिल पासून आणि किस्ना खाजगी लॅब मार्फत दि. 21 जुलै पासून तपासणीसाठी प्राधीकृत करण्यात आल्या आहेत. सांगली जिल्ह्यासाठी सद्यस्थितीत एकूण 3 आर.टी.पी.सी.आर लॅब थ्रोट स्वॅब तपासणीसाठी उपलब्ध आहेत. त्याबरोबरच जिल्ह्यातील खाजगी वैद्यकिय महाविद्यालयांच्या 2 आर.टी.पी.आर. लॅब लवकरच कार्यान्वीत होत आहेत. त्यामुळे तपासण्यांची क्षमता आणखी वाढवून अहवाल येण्याचा कालावधी कमी होईल, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी रूग्णालयास आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा देण्यासाठी सन 2019-20 अंतर्गत 6 कोटी 36 लाख 29 हजार 910 रूपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देऊन आवश्यक बाबींची पूर्तता करण्यात आली आहे. तसेच सन 2020-21 मध्ये ही आवश्यक सोयी सुविधांसाठी 7 कोटी 35 लाख 49 हजार 127 रूपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता दिली आहे व आवश्यक कामे प्रगतीपथावर आहेत.
सन 2019-20 मध्ये प्रशासकीय मान्यता दिलेल्या निधीमधून एन 95मास्क 40 हजार, हॅण्डग्लोव्हज नॉन स्टेरिलायझर 40 हजार 500, गॉगल्स 1700, पीपीई किट 29 हजार 700, व्हीटीएम-01 पॅक 7 हजार, फेस शिल्ड 300, वॉल माऊंटेड पल्स ऑक्सीमिटर 21 हजार 840, बीएमडब्ल्यू बॅग्ज 10 हजार, कोकरूड येथील ग्रामीण रूग्णालय व शिराळा येथील उपजिल्हा रूग्णालयामध्ये कोरोना बाधित रूग्णांसाठी आयसोलेशन वॉर्डमध्ये ऑक्सीजन पाईप लाईन पुरवठा करणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथे 6 के.एल. ऑक्सीजन टँक उभारणे, सीसीटीव्ही सिक्युरिटी सिस्टीम तसेच इतर साहित्य व स्थापत्य स्वरूपाची कामे करण्यात आली आहेत.
सन 2020-21 मध्ये प्रशासकीय मान्यता दिलेल्या निधीमधून 50 हजार ॲन्टीजन किट, 500 रेमडीसिव्हीर इन्जेंक्शन तसेच इतर इतर इन्जेंक्शन व औषधे, 20 हजार व्हीटीएम किट, 10 हजार पीपीई किट, ईसीजी मशिन, सक्शन मशिन, युपीएस व अन्य साहित्य सामग्री, तासगाव, आटपाडी, विटा, करंजे (ता. खानापूर), आष्टा (ता. वाळवा), कोकरूड (ता. शिराळा), जत, कडेगाव येथील ग्रामीण रूग्णालयामध्ये तसेच शिराळा व कवठेमहांकाळ येथील उपजिल्हा रूग्णालयामध्ये व पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली येथे इमारत क्र. मध्ये कोरोना बाधित रूग्णांसाठी असणाऱ्या आयसोलेशन वॉर्डमध्ये ऑक्सीजन पाईप लाईन पुरवठा व स्थापन करणे, शासकीय तंत्रनिकेतन मिरज येथील मुलांच्या व मुलींच्या वसतिगृहामध्ये कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी इमारतीची दुरूस्ती करणे, मिरज शासकीय रूग्णालयातील शवागृहात शीतकक्ष तयार करणे, 160 केव्हीए डीजी सेट, पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली येथे नवीन आयसीयु युनिट, कोविड रूग्णांच्या नातेवाईकांकरिता प्रतिक्षा कक्ष व शेडचे बांधकाम, उपजिल्हा रूग्णालय इस्लामपूर येथे 3 केएल ऑक्सीजन टँक बसविणे, ग्रामीण रूग्णालय आष्टा व तासगाव (कोरोना केअर सेंटर) इमारतीची दुरूस्ती करणे आदि विविध कामे हाती घेण्यात आली आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close