सांगली

ॲन्टीजेन टेस्टसाठी खाजगी पॅथॉलॉजीस्टनी पुढाकार घ्यावा : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 24 : सांगली जिल्ह्यामध्ये कोविड-19 च्या रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असून मृतांच्या संख्येतही वाढ होत आहे. त्यामुळे रूग्णांना लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. कोविड-19 च्या निदानासाठी आरटीपीसीआर व रॅपीड ॲन्टीजेन टेस्ट करण्यात येत आहेत. रूग्ण निदान लवकर करण्याच्या दृष्टीने खाजगी पॅथॉलॉजीस्ट व मायक्रोबायोलॉजिस्टनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले. यावेळी त्यांनी महानगरपालिका क्षेत्रासह तालुकास्तरावरही खाजगी लॅबनी ॲन्टीजेन टेस्टची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देशित केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड-19 च्या अनुषंगाने खाजगी पॅथॉलॉजिस्ट व मायक्रोबायोलॉजीस्ट यांची बैठक जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, खाजगी लॅबमध्ये वर्षानुवर्षे वेगवेगळ्या तपासणीच्या अनुषंगाने रूग्ण जात असतात. अशा रूग्णांच्या दृष्टीने ओळखीच्या असणाऱ्या खाजगी लॅबमध्ये ॲन्टीजेन टेस्ट उपलब्ध करून दिल्यास ते सहजपणे या सुविधेचा लाभ घेऊ शकतील. यातून एखादी व्यक्ती कोरोना बाधीत आढळल्यास त्याच्यावर लवकर उपचार सुरू होऊ शकतील व प्रादुर्भावाला अटकाव करणे शक्य होईल. त्यामुळे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात व तालुकास्तरावर खाजगी लॅबनी पुढाकार घेऊन ॲन्टीजेन टेस्ट व रूग्णांनी मागणी केल्यास ॲन्टीबॉडी टेस्ट या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. शासनाने खाजगी लॅबमधून होणाऱ्या ॲन्टीजेन टेस्टचे दरही निश्चित करून दिले आहेत त्यानुसारच शुल्क आकारणी व्हावी. लॅबनी टेस्ट केलेला डेटा त्याचदिवशी पोर्टलला भरणे आवश्यक आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close