
*स्वातंत्र्यदिनी विविध उपक्रम
*सकाळी ध्वनी व्यवस्थेचे उद्घाटन
*कार्यकारिणीच्या फलकाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन
भिलवडी : नव्याने स्थापन झालेली भिलवडी व्यापारी संघटना स्वातंत्र्यदिनी विविध उपक्रम घेऊन आपल्या कार्याला सुरुवात करणार आहे,अशी माहिती अध्यक्ष रमेश पाटील यांनी दिली.
पाटील म्हणाले, संपूर्ण भिलवडी गावाला ऐकू जाईल अशी कायमस्वरूपी ध्वनीव्यवस्था व्यापारी संघटनेने उभारणार आहे. स्वातंत्र्यदिनी सकाळी नऊ वाजता राष्ट्रगीताने या ध्वनी व्यवस्थेचे उद्घाटन होणार आहे. व्यापारी संघटनेच्या नूतन कार्यकारिणीच्या फलकाचे भिलवडीतील मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार समारंभ आयोजित केला आहे.
आपत्कालीन परिस्थितीमध्ये काम करणाऱ्या काही व्यक्तींचा सत्कारही व्यापारी संघटनेच्या वतीने होणार आहे. भिलवडी बाजारपेठेतील सर्व व्यापारी या वेळी आपल्या दुकानांसमोर रांगोळी काढून आयोजित विविध उपक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत,अशी माहिती त्यांनी आयोजित बैठकीनंतर दिली.
यावेळी दिलीप कोरे, रणजित पाटील, जावेद तांबोळी, दिलावर तांबोळी, महेश शेटे, विजय शिंदे उपस्थित होते.
दीपक पाटील यांनी आभार मानले.