ताज्या घडामोडीमहाराष्ट्रसांगली

पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते पूरप्रवण गावांसाठी फायबर ग्लास यांत्रिक बोटींचे लोकार्पण

सांगली, दि. 9 : गतवर्षी सांगली जिल्ह्याने भीषण महापुराचा सामना केला. त्यातुन जिल्ह्यात अद्ययावत अशा यांत्रिक बोटींची गरज अधोरेखित झाली. भविष्यात महापूराची स्थिती निर्माण झाल्यास जिल्ह्यात बोटींची सुसज्जता असावी यासाठी जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या निर्देशानुसार जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत नाविण्यपूर्ण योजनेतून फायबर ग्लास यांत्रिक बोटी खरेदी करण्यात आल्या. या बोटींचे लोकार्पण पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. यावेळी बोटींची पहाणी करताना अत्यंत सुंदर अशा बोटींची निर्मिती केल्याबद्दल त्यांनी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुड्डेवार आणि पुरवठादार व्ही. डी. जामदार यांचे कौतुक केले.
कृष्णा घाट सांगली येथे जिल्ह्यातील कृष्णा, वारणा नदी काठावरील पूर बाधित गावांना फायबर ग्लास यांत्रिक बोटींचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार मानसिंगराव नाईक, जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुड्डेवार, महानगरपालिकेचे पदाधिकारी आदि उपस्थित होते.
जिल्हा परिषदेमार्फत पूर बाधित गावांना फायबर ग्लास यांत्रिक बोट पुरविण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत नाविण्यपूर्ण योजनेतून २ कोटी १० लाख रूपयांची तरतुद करून एकूण १५ बोटी खरेदी करण्यात आल्या. या फायबर ग्लास यांत्रिक बोटी शिराळा तालुक्यातील सागावं, कोकरूड व आरळा, वाळवा तालुक्यातील भरतवाडी, वाळवा, शिरगांव व गौंडवाडी, मिरज तालुक्यातील हरीपूर, अंकली, मौजे डिग्रज व माळवाडी तसेच पलूस तालुक्यातील भिलवडी, आमणापूर, ब्रम्हनाळ, घनगावं-तावदरवाड या प्रत्येक गावांना १ या प्रमाणे देण्यात येणार आहेत.
या बोटीची प्रवासी क्षमता १६ प्रवासी अधिक २ चालक अशी १८ प्रवासी क्षमता असून आपत्ती अति तात्तडीच्यावेळी २० प्रवासी क्षमता आहे. बोटीची लांबी २४ फूट असून रूंदी ७ फुट, उंची २ फुट ६ इंच, फायबर जाडी तळाची ८ मि.मी., बाजूची जाडी 6 मि.मी., बोट शेप व्ही आकार असून फायबर मटेरियल रेनिज + फायबर मॅट (आयआरएस मान्यता प्राप्त) आहे. ३० एचपी इंजिन क्षमता असून २५ नग जीवन रक्षक कवच (लाईफ जॅकेट एमएमबी/आयआरएस मान्यता प्राप्त) प्रती बोट, ५ नग जीव रक्षक रिंग्ज, २५ किलो वजन नांगर, ४ नग ओर्स (वल्हे), १०० फुट लांबीचा २० मी.मी. जाडीचा नायनॉल दोर, बोटीच्या दोन्ही बाजूस रेलिंग, बोट वाहतुकीसाठी ट्रॉली अशी ॲसेसरी आहे.
तसेच जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) मधून पूरबाधित गावांसाठी आणखी ७ फायबर ग्लास यांत्रिक बोटीसाठी ९८ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. या बोटी दि. ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत वितरणासाठी उपलब्ध होतील. या बोटी शिराळा तालुक्यातील मौजे चरण, वाळवा तालुक्यातील जुनेखेड, बिचुद व एैतवडे खुर्द, पलूस तालुक्यातील नागराळे व पुणदी (वा) तसेच मिरज तालुक्यतील पद्ममाळे या प्रत्येक गावासाठी एक या प्रमाणे देण्यात येणार आहेत.
सदर बोटींची तपासणी मेरीटाईन बोर्डाकडून करून घेण्यात आली असून सुरक्षिततेबाबत कोणतीही त्रुटी नसल्याची खात्री करण्यात आली आहे. ज्या ग्रामपंचायतींना या बोटी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत त्यांनी बोटींची देखभाल ठेवणे आवश्यक असल्याचेही पालकमंत्री जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले. याशिवाय आवश्यकतेनुसार आणखी बोटी उपलब्ध करून घेण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी जिल्ह्याला आवश्यक असणाऱ्या बोटींची बांधणी जिल्ह्यातील सुपुत्र श्री. जामदार यांनी अत्यंत अद्ययावत पध्दतीने केल्याबद्दल त्यांचे कौतुक करून पालकमंत्री जयंत पाटील यांनी संभाव्य महापूराला सक्षमपणे तोंड देता यावे यासाठी या बोटी तयार करून घेण्याचे निर्देशित केले होते, असे सांगून बोटी चालविण्याबाबत संबंधित गावातील नागरिकांना प्रशिक्षण देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close