खडे फोडण्यापेक्षा वंचित नुकसानग्रस्तांना पैसे मिळवून द्या : राहुल कांबळे
भिलवडी : महापुरामुळे भिलवडीकरांच्या शेतीचे व्यापाराचे प्रचंड नुकसान झाले. त्यावेळी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यवस्थित पंचनामे केले असते तर नुकसानग्रस्तांना मदत मिळाली असती. चुका तुमच्याच.. आणि यादीत पाणी मुरतंय म्हणायचं.. पण ते कोणामुळे मुरतंय हे पण कळू दे.सत्ता तुमची असताना दुसऱ्याच्या नावाने खडे फोडण्यापेक्षा वंचित नुकसानग्रस्तांना पैसे मिळवून द्या अशी मागणी भिलवडीचे माजी सरपंच राहुल कांबळे यांनी केली.
गेल्या पाच वर्षांपासून भिलवडी ग्रामपंचायतीमध्ये भाजपची सत्ता आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेतही सत्ता भाजपचीच आहे. महापूर आला त्यावेळी लोकांना बाहेर काढण्यापासून पूर ओसरल्यानंतर ग्रामपंचायतीने कुठलीही जबाबदारी घेतली नाही. लोकांना बाहेर काढतानाही राजकारण केले गेले. काही दानशूर व्यक्तींनी दिलेली मदतही स्वतःच्या मर्जीतल्या लोकांना वाटली आणि आता शासनाने दिलेल्या मदतीतही राजकारण करीत आहेत. पंचनामे आणि सर्व्हे करताना सत्ताधाऱ्यांनी जबाबदारीने काम केले असते तर नेमक्या पूरग्रस्तांना मदत मिळाली असती असे कांबळे म्हणाले.
आज फेर सर्व्हेमध्ये पाणी मुरतंय असा सत्ताधाऱ्यांचं म्हणण आहे. प्रस्ताव तयार करताना सरपंच,ग्रामसेवक आणि दोन सदस्यांच्या सह्या घेण्यात आल्या होत्या. त्यावेळी प्रस्ताव बोगस आहे असे म्हणून का थांबवलं नाही असा सवाल त्यांनी केला.जबाबदारी झटकून दुसर्यावर आरोप करण्यातच सत्ताधाऱ्यांनी धन्यता मानली आहे.
भिलवडीचे सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यात वर्ष झालं ताळमेळ नाही.केवळ शुल्लक तक्रारीवरून गावाला हा ग्रामसेवक नको अशी हटवादी भूमिका कुणी घेतली हे
गावाला माहिती आहे. यामुळे सहा महिने कर्मचाऱयांचे पगारही दिले नव्हते.
यादी लपवायला तो काय राफेलचा करार आहे का असे एक पदाधिकारी म्हणतात. भाजप सरकारकडूनही राफेलची सगळी माहिती सांगितली जाते.. पण किंमत सांगितली जात नाही. तसं यादीतल्या तुमच्या बगलबच्च्यांची नावेही सांगितली जात नाहीत. राफेलची किंमत आणि तुमच्या मर्जीतल्या लाभार्थींची नावे उघड करा असे आव्हान राहुल कांबळे यांनी दिले.
ग्रामपंचायतींमध्ये सरपंचांचे दर्शन दुर्मिळच आहे. कोरोनाच्या संकटातही त्यांनी गावाला वाऱ्यावर सोडलं. सरपंच नसलेलं गाव अशी भिलवडीची परिस्थिती आहे.
राहुल कांबळे म्हणाले की अजूनही बर्याच पूरग्रस्तांना पडझडीचे पैसे मिळाले नाहीत. खरे लाभार्थी अजूनही वंचित आहेत. खरोखरच ज्यांचं नुकसान झालं अशा काही पूरग्रस्तांची कागदपत्रे उशिरा जमा झाली. त्यांचा फेर सर्व्हे झाला आहे.आता जर त्यांना मदत नाही मिळाली तर दुसऱ्यापुढे हात पसरण्याशिवाय पर्याय नाही.पुढची ग्रामपंचायत निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्यापेक्षा काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाची मदत गोरगरिबांपर्यंत कशी पोहोचेल यासाठी प्रयत्न करावेत.
नुकसान झाले असतानाही आम्हाला मदत मिळणार नसेल तर आम्ही ग्रामपंचायतीसमोर आत्मदहन करू, असा इशाराही यावेळी गरजू नुकसानग्रस्तांनी दिला.