गंभीर रूग्णांवर तात्काळ उपचार सुरू करा; रूग्णांची हेळसांड सहन करणार नाही : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 04 : कोविड-19 साठी राखीव ठेवण्यात आलेल्या सर्व रूग्णांलयांनी तात्काळ उपचाराची गरज आहे अशा रूग्णांना प्राधान्याने ॲडमिट करून घेऊन तात्काळ उपचार सुरू करावेत. बेड्स उपलब्ध नसल्याचे कारण सांगून अशा रूग्णांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवू नये. अचानकपणे येणाऱ्या गंभीर रूग्णांसाठी रूग्णालयांनी काही बेड्स कायमस्वरूपी उपलब्ध ठेवावेत. प्रशासन कोणत्याही स्थितीत रूग्णांची हेळसांड सहन करणार नाही, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी गोपिचंद कदम, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, उपजिल्हाधिकारी डॉ. विजय देशमुख, मिरज उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, डॉ. निरगुंडे, डॉ. दिक्षीत, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी यासीन पटेल, जिल्हा कोषागार अधिकारी सुनिलकुमार केंबळे आदि उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेमध्ये समाविष्ठ रूग्णांकडून कोणत्याही स्थितीत रूग्णालयांनी डिपॉझीट घेऊ नये. त्याचप्रमाणे या योजनेशी संलग्न इन्शुरन्स कंपनीच्या प्रतिनिधींनीही प्री ऑथ नाकारली जाणार नाही याची काटेकोर दक्षता घ्यावी. कोविड उपचारांसाठी राखीव ठेवलल्या रूग्णालयांतील बिलांबाबत नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. या अनुषंगाने रूग्णालयांनी शासनाने दिलेल्या निर्देशानुसारच बिल आकारणी करावी. बिलांसंदर्भातील तक्रारी टाळण्यासाठी प्रत्येक रूग्णालयाने कोविड उपचारासाठी शासनाने निर्धारीत केलेले पॅकेज व रॅकरेट दर यांची माहिती ठळकपणे दर्शनी भागात लावावी. तसेच विहीत वेळेत बेड इन्फॉर्मेशन सिस्टीम अद्ययावत करावी. या बैठकीत बायोमेडिक वेस्टच्या अनुषंगाने चर्चा झाली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी संबंधित यंत्रणेने राज्य शासनाच्या निर्देशाशिवाय कोणतीही दरवाढ करू नये, असे स्पष्ट केले.