महाराष्ट्र

सर्वसामान्‍य माणूस ‘केंद्रबिंदू’ मानून काम केले : विभागीय आयुक्‍त डॉ. म्‍हैसेकर

पुणे दि. 31 : आपण सर्वसामान्‍य माणूस ‘केंद्रबिंदू’ मानून काम केल्‍याची भावना मावळते विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी व्‍यक्‍त केली. लोकाभिमुख व सतत सकारात्मक भूमिका ठेवणारे अधिकारी अशी ओळख असणारे डॉ. म्हैसेकर आज (31 जुलै ) नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. विभागीय आयुक्त कार्यालयातील झुंबर हॉल मध्ये पार पडलेल्या निरोप समारंभात त्‍यांनी आपल्‍या भावना व्‍यक्‍त केल्‍या. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांच्‍या पत्‍नी रोहिणी आणि मुलगा अथर्व उपस्थित होते. त्याचबरोबर नूतन विभागीय आयुक्त सौरभ राव, अपर विभागीय आयुक्त राजेंद्र भोसले, पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. दौलत देसाई, सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह, पुणे महानगर पालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय भागवत, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी प्रकाश वायचळ, सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्त पवनीत कौर, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्‍त शांतनू गोयल, निवासी उपजिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे तसेच विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त, उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार तसेच विभागीय आयुक्त कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

डॉ. म्‍हैसेकर म्‍हणाले, सामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून आपले कर्तव्य पार पाडतांना परिस्थितीची जाणीव ठेवावी लागते. समाजातील कोणत्याही घटकावर अन्याय होणार नाही, याची काळजी घेवून काम केल्यास कामाचा आनंद मिळतो. सामान्य नागरिकांचा प्रशासकीय यंत्रणेवर प्रचंड विश्वास असतो. या विश्वासाला तडा न जावू देता काम करणे गरजेचे असते. सामान्य माणसाला योग्य प्रकारे न्याय मिळेपर्यंत परिस्थिती हाताळली पाहिजे. आपण सर्वजण महत्त्वाच्या पदावर काम करतांना शासन व नागरिक यांच्यामधील दुवा म्हणून काम करीत असतो. लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवून, सहकाऱ्यांना सोबत घेत काम करणे फार महत्त्वाचे असते. एखाद्या प्रकरणाचा निकाल देतांना सर्व बाजूंनी विचार करुन वस्तूनिष्ठ निकाल देण्याचा प्रयत्न असला पाहिजे. प्रत्येक संकट आपल्यासाठी संधी असते. या संकटावर मात करण्यासाठी नेहमी सकारात्मक दृष्टिकोनातून शांतपणे विचार करुन निर्णय घेणे अपेक्षित असते. या काळात सर्वांचे सहकार्य लाभले, याबद्दल सर्वांचा आभारी आहे, असेही डॉ. म्हैसेकर म्हणाले.

परभणी येथे जिल्‍हा परिषदेत उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी म्‍हणून काम करत असतांना एका शेतकऱ्याने दुपारी 4 च्‍या दरम्‍यान नाव लिहून भेटण्‍यासाठी चिठ्ठी पाठवली. कामाच्‍या व्‍यापात त्‍याला सायंकाळी 6 वाजता चेंबरमध्‍ये बोलावले. पण तो निघून गेला होता. त्‍यानंतर तीन-चार दिवसांनी तो आल्‍यानंतर त्‍याला म्‍हणालो, ‘एवढी काय घाई होती, थांबायला काय झालं होतं?’,त्‍यावर तो शेतकरी नम्रपणे म्‍हणाला, ‘साहेब, मला गावाला परत जायला संध्‍याकाळी 6 ला शेवटची बस होती. मी जर थांबलो असतो, तर मला मुक्‍काम करावा लागला असता आणि माझी इथं काहीही सोय नाही’ या प्रसंगानंतर मी सामान्‍य माणसाला कधीही वाट पहायला लावली नाही, अशी आठवण डॉ. म्‍हैसेकर यांनी सांगितली.

नूतन विभागीय आयुक्त सौरभ राव यांचा विभागीय आयुक्त कार्यालयाच्यावतीने सत्कार करण्यात आला. ते म्हणाले, महाराष्ट्र राज्यात अनेक नामवंत अधिकारी होऊन गेले आहेत. त्यांची प्रशासकीय कार्यप्रणाली आमच्यासारख्या अधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरत आहे. या प्रशासकीय कार्यप्रणाली व संस्कृतीमुळे महाराष्ट्राचे नाव देशभरात नेहमी चर्चेत असते. डॉ. म्हैसेकर यांच्यासोबत काम करतांना त्यांच्या कार्यपद्धतीचा, बारकाईने अभ्यास करण्याच्‍या गुणाचा फायदा होणार आहे. कोविड परिस्थितीवर मात करण्यास आम्हा सर्वांसाठी त्यांचा अनुभव मार्गदर्शक ठरणार आहे. श्री. राव यांनी रामायणातील ‘धीरज धर्म मित्र अरु नारी, आपद काल परिखिअहिं चारी’ या उक्‍तीचा संदर्भ दिला. संकटकाळात धैर्य, धर्म, मित्र यांची खरी ओळख होते. कोरोनाच्‍या संकटकाळात काम करतांना सर्वांच्‍या मदतीने यश मिळेल, असा विश्‍वास त्यांनी व्‍यक्‍त केला. या पुढील कालावधीत कोविड प्रादुर्भाव रोखणे हे आमच्यासमोरील प्रमुख आव्‍हान आहे, या करिता आपणाला ‘मिशन मोड’वर काम करुन परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे,असे सांगून डॉ.म्हैसेकर यांचे पुढील आयुष्य सुखसमृद्धीचे, भरभराटीचे व उत्तम आरोग्यदायी जावो, अशा शुभेच्छाही श्री. राव यांनी यावेळी दिल्या.

जिल्हाधिकारी नवल किशार राम म्हणाले, डॉ. म्‍हैसेकर यांच्या सोबत काम करतांना त्यांचा अनुभव आमच्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्यावेळी पुणे जिल्हा प्रशासनाने केलेल्या कामाची दखल केंद्रीय स्तरावर घेण्यात आली, त्याचे श्रेय डॉ. म्हैसेकर यांच्‍या नेतृत्‍वाला जाते. त्यांच्या अंगी असलेली उत्तम सांघिक कार्य करण्याची क्षमता, नेतृत्वगुण, शांत आणि कार्यतत्पर वृत्ती आमच्यासाठी महत्त्वाची आहेत. कोवीड-19 च्या अनुषंगाने त्‍यांनी नियोजनपूर्वक रणनिती आखली होती. त्‍याचा आम्‍हाला कोरोनाचे संकट कमी करण्‍यात मदत झाली.

कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. दौलत देसाई, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, माध्यमांच्यावतीने जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांच्या सह विविध अधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त संजयसिंह चव्हाण यांनी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close