सांगली

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती दिनी त्यांच्या विचारांचे चिंतन घरीच राहून करा : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा

सांगली, दि. 31 : जगात व देशात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लोकांनी आरोग्याच्या दृष्टीकोनातून घराबाहेर पडू नये. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची जयंती जनतेने घरातच राहून त्यांच्या विचारांचे, कार्याचे, साहित्याचे चिंतन करून साजरी करावी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या दि. १ ऑगस्ट रोजी साजऱ्या होणाऱ्या १०० व्या जयंती दिनानिमित्त् जिल्ह्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या समग्र साहित्याचा माणूस हा केंद्रबिंदू आहे. माणसाचं माणूस असणारे मुल्य आणि त्याची मानवी प्रतिष्ठा यासाठी अण्णा भाऊ साठे यांनी आपली वाणी व लेखणी झिजवली. गावकुसाबाहेरचा, राबणारा, कष्ट करणारा, घाम गाळणारा माणूस आणि त्याची असणारी जीवनावरची निष्ठा यासाठी अण्णा भाऊ साठे लिहीत आणि गात राहिले. सर्वसामान्य माणसाला नायक आणि नायिका बनवणारे अण्णा भाऊ साठे हे मराठीतील महत्वाचे साहित्यिक आहेत. कृष्णा, कोयना, वारणा आणि पंचगंगा या नद्यांच्या खोऱ्यातील म्हणजेच सातारा, सांगली, कोल्हापूर परिसरातील लोकपरंपरा, लोकरूढी, गावगाढा आणि स्वातंत्र्य चळवळ याबरोबरच संयुक्त महाराष्ट्राची चळवळ अणा भाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून सातासमुद्रापलिकडे पोहचवली. सर्व प्रकारच्या कर्मठ आणि कट्टरपणाला विरोध करून न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुभावाची रूजवणूक अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून केली. अशा या महान साहित्यिक, लोकशाहीराच्या 100 व्या जयंती दिनी आपण सर्वांनीच त्यांच्या कार्याचे, त्यांच्या चरित्राचे, त्यांच्या विचारांचे या दिवशी स्मरण करून त्यांच्या प्रती आदर व्यक्त करावा. त्यांची जयंती जनतेने घरातच थांबून साजरी करून त्यांना अभिवादन करावे. आणि कोरोनाविरूध्दच्या लढाईतील एकजूट दाखवावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील सर्व श्रेष्ठ मानवी मुल्यांचे चिंतन जन्मशताब्दी दिनी करून सर्व नागरिकांनी आपल्या घरी थांबूनच त्यांना अभिवादन करावे व त्यांच्या प्रति आदर व्यक्त करावा. तसेच प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन अण्णा भाऊ साठे यांचे नातू सचिन साठे व कुटुंबिय तसेच साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी समितीचे सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close