सांगली

कोविड-19 : लक्षणे व सक्रीय उपचाराची गरज असणाऱ्या रूग्णांनाच कोविड रूग्णालयांमध्ये दाखल करून उपचार करावेत : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 30 : कोविड-19 रूग्णांलामध्ये लक्षणे असलेल्या व ज्यांना रूग्णालयीन उपचाराची गरज आहे, अशाच कोविड पॉझिटीव्ह रूग्णांना दाखल करून घेणे व त्यांच्यावर उपचार करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यानुसार कोविड-19 उपचारासाठी राखीव ठेवलेल्या रूग्णालयातील बेड्स लक्षणे असलेल्या व ज्यांना सक्रीय उपचाराची गरज आहे अशाच कोविड पॉझिटीव्ह रूग्णांना दाखल करून त्यांच्यावर उपचार करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या.
कोरोनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी गोपिचंद कदम, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, उपजिल्हाधिकारी डॉ. विजय देशमुख, मिरज उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, डॉ. निरगुंडे, डॉ. दिक्षीत, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी यासीन पटेल आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, सौम्य लक्षणे असणाऱ्या किंवा लक्षणे नसलेल्या व ज्यांना सक्रिय वैद्यकिय उपचाराची गरज नाही अशा रूग्णांना कोणत्याही परिस्थितीत कोविड रूग्णालयात दाखल करून घेऊ नये. तर अशा रूग्णांना कोविड केअर सेंटर किंवा त्यांच्या पसंतीनुसार पात्र असल्यास होम आयसोलेशनमध्ये ठेवावे. यावेळी त्यांनी फॅसिलिटी ॲप व बेड मॉनिटरिंग सिस्टीम विहीत कालावधीत अद्ययावत करणे बंधनकारक असून महापालिका आयुक्त व जिल्हा शल्य चिकित्सक यांनी संबंधित यंत्रणांना याबाबत निर्देशित करावे, असे सांगितले.
या बैठकीत कोविड-19 रूग्णांवर उपचार करण्यात येत असणारी शासकीय व अधिग्रहित करण्यात येणारी खाजगी रूग्णालये या ठिकाणचे रूग्ण तसेच कर्मचारी वृंद यांना मानसोपचार तज्ज्ञांमार्फत समुपदेशन करावे. तसेच अद्यापही कर्तव्यावर रूजू न झालेल्या खाजगी वैद्यकीय व्यवसायिक व कर्मचारी यांना मेस्मा कायद्यांतर्गत नोटीस बजावाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close