ताज्या घडामोडी

हिंदकेसरी पै.मारुती माने यांच्या पुण्यस्मरणार्थ खास लेख

भीमरुपी महारुद्रा वज्र हनुमान “मारुती” हे समर्थ रामदासांनी साक्षात भगवंत मारुतीरायाचे केलेले वर्णन पै. मारूती भाऊ मानेंना तंतोतंत लागु पडते. शेतकरी कुटुंबात जन्मलेले हे रत्न नावाप्रमाणेच मारुतीचे भक्त होते. तसेच मारुतीप्रमाणे त्यांचे शरीर बलदंड तर होतेच पण, शक्तीही तशीच अचाट होती व वायू वेगाने कुस्त्या करण्यात कुशल आणि तरबेज होते. महाराष्ट्राच्या लाल मातीचा रांगडा रंग केवळ देशातच नव्हे तर जागतिक पातळीवरील अनेक मैदानात उधळणाऱया ख्यातनाम मल्लांची जी थोर परंपरा आहे त्यात सूर्यासारखे तळपत राहणारे मल्ल म्हणून ख्यातकीर्त झालेले मल्ल हिंदकेसरी मारूती भाऊ माने. एक मर्द गडी, रांगडा माणुस, मराठमोळ्या कुस्तीची पताका जगभर फ़डकवणारे मराठी मातीतील मल्ल, पायातल्या कोल्हापुरी जोड्यापासुन ते डोक्यावरील भरजरी फेट्यापर्यंत अस्सल मराठमोळा चेहरा. क्रिकेटच्या चमकत्या दुनियेत हरवलेल्या आजच्या पिढीला कदाचीत मारुती भाऊ मानेंच्या परक्रमाची कल्पना नसेल. क्रिकेटसारख्या आयात खेळाला आपण उचलून धरतो, पण भारतीय संस्कृतीतून निर्माण झालेली मल्लविद्या आसेतुहिमाचल पोहोचविणाऱ्या महाराष्ट्राच्या मल्लांना आपण विसरतो. पैलवान मारुती भाऊ मानेंचे नाव आजच्या पिढीला कितपत ठाऊक आहे माहिती नाही, पण एक काळअसा होता की, देशाच्या प्रत्येक कोपर्‍यातील माणूस त्यांना ओळखत होता. प्रचंड प्रचंड लोकप्रियता. आज सचिन तेंडुलकरला जेवढी लोकप्रियता आहे, तेवढीच लोकप्रियता त्या काळी पै. मारुती भाऊ मानेंना होती. खेळ कुठलाही असो, त्यात नांव कमवायचे, करीअर करायचे तर शहराच्या ठिकाणी जायला हवे असा एक सार्वत्रीक समज आहे. पण भाऊंनी हा समज खोटा ठरविला. कुस्ती शिकण्यासाठी त्यांनी कधी गांव सोडले नाही. त्याकाळी कोल्हापूर व सांगलीसारख्या पिढीजात नांवलौकीक असलेल्या मोठ मोठय़ा वस्तादांच्या मार्गदर्शनासाखाली चालणाऱया अशा सुप्रसिध्द तालमी असताना तिकडे न जाता आपल्या गावच्या तालमीतच भाऊंनी मेहनत केली आणी कुस्तीकला साध्य केली. गावात राहून मल्लविद्या आत्मसात करून आकाशाला गवसणी घालणारे महावीर अशी त्यांची ओळख. सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कवठे पिरान हे त्यांचे गांव. शेतकरी असलेले वडील ज्ञानू माने यांनी मारूती माने यांना वयाच्या बारा-तेराव्या वर्षीच लंगोट बांधला. कुठल्याही सोयी सुविधा नाहीत, भाऊना अनेकदा अर्धपोटी राहावे लागे तर अनेकदा उपाशी. पण कुस्ती व व्यायामाची आवड लागली होती. उपास घडला म्हणून व्यायाम टाळला असे कधीही त्याच्या आयुष्यात घडले नाही. लहानपणी जवळपासच्या गावांतून कुस्त्या करत फिरायचे. पण त्यातून पैसे फार मिळायचे नाहीत. कुस्त्यांच्या दंगलीत जायचे तर वाहन नाही. कुस्ती मारल्यावर मिळालेले बरेचसे पैसे सायकलच्या भाड्यातच जायचे. अशा अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतही कठोर परिश्रमाने आणि येणाऱया साऱया आव्हानांना पुरून उरत कवठेपिरान या खेडय़ातील एका वाघाने कुस्तीक्षेत्रात आपल्या पैलवानकीने अढळ आणि आदराचे स्थान निर्माण केले. लालमातीची रग आणि भरत चाललेली देखणी शरीरयष्टी कमावलेल्या मारूती माने यांना कवठे पिरानच्याच प्रसिद्ध वस्ताद दुंडाप्पाण्णा खोकले व पैलवान रावसाहेब मारेकरी यांनी या भरदार देहयष्टीच्या पैलवानाला कुस्तीच्या डावपेचाचे सुडौल पैलू पाडले. कवठेपिरानच्या बाहेर पाय टाकत भाऊ यांनी सांगलीत १९५८ साली झालेल्या मोठय़ा मैदानात पै. आण्णा पाटोळे या बलदंड पैलवानाची पाठ जमिनीला टेकवली. या कुस्ती नंतर वीस वर्षीय मारुती मानेंचे नाव गाजायला सुरुवात झाली. या यशानंतर मग वाघाच्या कातडय़ाच्या रंगाची लांग चढविणाऱया आणि दाढी वाढविलेल्या या बलदंड आणि पीळदार शरीरयष्टीच्या देखण्या मल्लाने मग मागे वळून पाहिलेच नाही. कुस्ती खेळायची ती जिंकण्यासाठी हे ध्येय उराशी बाळगुनच भाऊ प्रत्येक कुस्ती खेळायचे. जिल्हय़ात, राज्यात आणि परराज्यातही झालेल्या अनेक मैदानात भाऊंनी आपली ही ओळख कुस्तीशौकिनांच्या नजरेत साठवली होती.

१९६० चे दशक हा महाराष्ट्राच्या कुस्तीचा सुवर्णकाळ होता. या सुवर्णकाळचे शिल्पकार होते पै. मारूती भाऊ माने. पहिले “महाराष्ट्र केसरी’ पै. दिनकर दह्यारी यांच्याशी १८‍ एप्रिल १९५९ रोजी भाऊंची प्रेक्षणीय कुस्ती होऊन ती बरोबरीत सुटली. या कुस्तीत त्यांना जो आत्मविश्वास मिळाला त्याच्या बळावर त्यांनी ओरीसातील कटक येथे झालेल्या आशियाई गेम चाचणी स्पर्धेत त्यावेळचे प्रसिध्द पैलवान भीम सीलाराम यांच्यावर मात केली आणि १९६२ च्या जाकार्ता आशियाई स्पर्धेसाठी त्यांची पात्रता सिद्ध केली. या विजयाने त्यांना आंतराष्ट्रीय कुस्तीची मैदाने खुली झाली. १९६२ च्या जकार्ता आशियाई स्पर्धेत मारुती भाऊ माने हे केवळ फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात भाग घेणार होते.पण ऐनवेळी ग्रिको रोमन स्पर्धेतही भाऊ उतरले आणि न भूतो न भविष्यती अशी सुवर्णमय कामगिरी या देशासाठी केली. प्रथम फ्री स्टाईलमध्ये ९० किलो गटात जपानच्या हरुओ ताकागी या पैलवानावर मात करुन सुवर्णपदक जिंकले व दुस-या दिवशी ग्रिको रोमनमध्येही रौप्यपदकाची कमाई केली. आशियाई स्पर्धेत दोन भिन्न प्रकारात दोन पदके मिळवून भारतमातेच्या गळ्यात घातली. आणि जकार्तावीर ही बिरुदावली सिध्द केली. अशी देदीप्यमान कामगिरी करणारे कुस्तीगीर दुर्मिळच आहेत.

आशियाई यशानंतर दोनच वर्षांत पै. मारूती भाऊ मानेंनी हिंदकेसरीची गदा महाराष्ट्रात आणली. सन १९६४ पंजाबमधील कर्नालमध्ये झालेल्या हिंदकेसरी स्पर्धेची अंतीम लढत झाली ती पै. मारूती भाऊ माने व मेहरदीन पंजाबी याच्यांत. मेहरदीन हा चांगला ऊंचा पूरा धिप्पाड व तगड़ा पैलवान होता. त्याची उंची सहा फ़ुट पाच इंच होती. महाराष्ट्राच्या चमूला तो गिनतच नव्हता. या अंतीम लढतीत मेहरद्दिन या पैलवानावर मुलतानी डावावर मात करून भाऊंनी हिंदकेसरीची गदा महाराष्ट्रास मिळवून दिली. हिंदकेसरी किताब मिळवल्यानंतर तर संपुर्ण हिंदुस्थानात त्यांच्या नावाचा बोलबाला झाला. कवठेपिरानसारख्या एका छोट्याशा खेड्यात जन्मलेले भाऊ लहानपणापासुन कुस्ती आणि व्यायामाकडे लक्ष देतात काय आणि काही वर्षातच कुस्तीतील सर्वोच्च पद म्हणून ओळखले जाणारा ‘हिंदकेसरी‘ किताब मिळवतात काय. या सार्‍याच गोष्टी सगळ्यांना अचंबित करणार्‍या असल्या तरी त्यामागे त्यांची असलेली जिद्द, उमेद, कर्तृत्व आणि त्यांनी यासाठी घेतलेले अपार कष्ट याला तोड नाही. खेडेगांवात राहुन “हिंदकेसरी” चा किताब मिळवणारे मारुती भाऊ मानें एकमेव पैलवान होते. १९६४ मध्ये कोल्हापुरात महंमद हनीफ व पै. भीमसेन (सेनादल) दिल्ली यांना अस्मान दाखवून त्यांनी कुस्ती क्षेत्रातील दिग्गजांचे लक्ष आपणाकडे वेधून घेतले.

६ मार्च १९६५ रोजी कोल्हापूरच्या ऐतिहासिक खासबाग मैदानात हिंदकेसरी पै. मारूती भाऊ माने आणि मल्लसम्राट पै. विष्णूपत सावर्डेकर या दोन महाकाय मल्लांमध्ये जबरदस्त अशी अजरामर लढत झाली. कुस्तीचा दिवस उजाडला. लोक झुंडीच्या झुंडी करून खासबाग कडे निघाले. ही कुस्ती पाहण्यासाठी खासबाग खचाखच भरले होते. मैदानात व मैदानाबाहेर मुंगी शिरायलाही जागा नव्हती, इतकी प्रचंड गर्दी उसळली होती. या कुस्तीचा थरार पाहायला जवळ जवळ एक ते दीड लाखापेक्षा जास्त कुस्तीशौकीन आले होते. खासबाग मैदानाची क्षमता आहे १ लाख प्रेक्षक. १ लाखाची क्षमता संपली. दरवाजे बंद झाले. तरीपण २० हजार प्रेक्षक तिकीट काढून बाहेर फ़िरत होते. छत्रपती शाहु महाराजांनी बांधलेले हे मैदान या रेकॉर्डब्रेक कुस्तीनंतर आजतागायत इतके कधीच भरले नाही. भाऊंच्या कुस्तीने महाराष्ट्राला असे वेड लावले होते. असा होता तो काळ. तब्बल अडीच तास चाललेल्या कुस्तीत डाव प्रतिडाव यांचे प्रदर्शन कुस्तीप्रेमींना पाहण्यास मिळाले. अखेर तब्ब्ल दोन तास चाळीस मिनीटानी पै. मारूती भाऊ माने यांनी या लढतीत बाजी मारली. दीर्घकाळ म्हणजे तब्बल अडीच तास चाललेली ही झुंज बघणाऱ्यांच्या डोळ्यात आणि ऐकणाऱ्यांच्या कानात अद्यापही जशीच्या तशी घर करून राहिली आहे. याचा प्रत्यय कुस्तीवर चर्चा सुरू झाली की वारंवार येतो. कुस्तीच्या इतिहासात दीर्घकाळ चाललेली लढत म्हणून या कुस्तीचा उल्लेख केला जातो. कोल्हापूरच्या खासबाग मैदानात आजवर अनेक ऐतिहासिक लढती झाल्या त्यामध्ये सुवर्ण अक्षरांनी नोंद घ्यावी, अशी ही कुस्ती झाली. ही कुस्ती आजही लाल मातीच्या कुस्तीतील सर्वोच्च कुस्ती म्हणून ओळखली जाते. आजही अनेक पैलवान या कुस्तीबाबत भरभरून बोलताना दिसतात

कुस्ती हा पै. मारूती भाऊ माने यांचा प्राण होता. कुणाशीही कुस्ती करायला त्यांनी कधीच नकार दिला नाही. आपल्यापेक्षा नांव असलेल्या मल्लाशीही त्यांनी कुस्त्या केल्या आणि त्या जिंकल्याही. संबंध महाराष्ट्रात पै. मारूती भाऊ माने यांना त्या काळात जोडच नव्हती. त्यामुळे उत्तर भारतातील एखादा दिग्गज पैलवान आणून त्याच्याशी पै. मारुती भाऊ माने यांच्याशी जोड लावून मैदान घेण्याची तयारी सुरू केली. याच काळात उत्तर भारतातील दिग्गज मल्ल म्हणून चंदगीराम यांची ओळख झाली होती. “बंदर दौड’ या हातावर चालण्याच्या व्यायामात चंदगीराम याची हातोटी इतकी होती;की त्यांची सर्व ताकद दोन हातात एकवटली होती. त्यामुळे कुस्ती मैदानात जर चंदगीराम यांनी प्रतिस्पर्धी मल्लाचे मनगट पकडले तर त्यातून सुटका करून घेणे केवळ आणि केवळ अशक्य ठरत होते. कलाई पकड़ या डावावर चंदगीराम याचे प्रचंड प्रभुत्व होत. याच ताकदीच्या बळावर चंदगीरामनी कुस्त्या केल्या व हिंदकेसरी (१९६२) पर्यंत भरारी घेतली. हिंदकेसरी पै. मारूती भाऊ माने व हिंदकेसरी पै. चंदगीराम या दोघांच्यात संभाव्य लढत होण्यासाठी अनेक ठेकेदार इच्छुक होते. बेळगावला १९६६ साली हे मैदान आयोजित करण्यात आले. महाराष्ट्रातुनच नव्हे तर देशातुन कुस्तीशौकीनांनी या मैदानावर हजेरी लावून गर्दीचा एक उच्चांक निर्माण केला होता. पै. चंदगीराम विरूध्द पै. मारुती भाऊ माने यांच्या या कुस्तीला जवळपास सुमारे एक लाख प्रेक्षक उपस्थित होते. ही कुस्ती ही एक प्रदीर्घ काळ चाललेली कुस्ती म्हणून ओळखली जाते. अत्यंत तुल्यबळ लढत असल्याने एक रोमहर्षक कुस्ती पाहण्याचा एक विलक्षण योगच कुस्ती शौकिनांना मिळाला होता. अखेर पै. मारुती भाऊ माने यांनी चंदगीराम यांना आस्मान दाखविले. व अखंड हिन्दूस्थानात आपणच सर्वश्रेष्ठ असल्याचे सिध्द केले. हा क्षण त्या काळच्या वृत्तपत्रातही दुसर्‍या दिवशी सचित्र प्रसिध्द झाला होता. यावरूनच पै. मारुती भाऊ माने यांच्या लढतीची राज्यात व देशात असलेली उत्सुकताच स्पष्टपणे दिसून येत होती.

देशातील अनेक मैदाने गाजविल्यानंतर पै. मारुती भाऊ माने पुन्हा एकदा जागतिक स्तरावर स्पर्धा खेळण्यासाठी इंग्लंडच्या दौर्‍यावर गेले. इंग्लंडमध्ये १९६७ मध्ये मॅंचेस्टर येथे रशियाचा जागतिक किर्तीचा मल्ल अलेक्झांडर मिदविद याच्याबरोबर अत्यंत निर्धाराने, चिवटपणे निकराची झुंज देऊन रौप्यपदक पटकाविले. अलेक्झांडर मिदविद हा त्या काळातील प्रचंड दबदबा असलेला मल्ल होता. तब्बल ७ वेळा खुल्या गटात जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक तर एक वेळा रौप्य व एक वेळा कांस्य पदक, युरोपियन चॅम्पियनशिप स्पर्धेत 3 वेळा सुवर्णपदक आणि प्रतिष्ठीत अशा ऑलिम्पिकस्पर्धेत सलग 3 वेळा सुवर्णपदक जिकुन जगज्जेतेपद कायम ठेवणारा पैलवान म्हणून अलेक्झांडर मिदविद यांची ख्याती. ६ फूट २ इंच उंची आणि १०५ किलो वजन असलेला गोरापान रशियन मल्ल ज्याने कुस्ती क्षेत्रात शतकातील सर्वश्रेष्ठ मल्ल होण्याचा मान मिळवला. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ असोसिएटेड रेस्लिंग स्टिल्स (फिला) यांनी “इतिहासातील सर्वोत्तम कुस्तीपटूंपैकी एक” अशी उपाधी अलेक्झांडर मिदविद ला दिली होती. अशा या मल्लाशी जगातला कोणताही मल्ल दोन मिनिटापेक्षा अधिक काळ लढा देऊ शकत नव्हता. अशा या अलेक्झांडर मिदविद बरोबर तब्बल ११ मिनिटे झुंज देऊन हिंदकेसरी पै. मारुती भाऊ माने यांनी रौप्यपदक पटकाविले. कुस्तीनंतर दमछाक झालेला मिदवेद गर्दीतून वाट काढत बाहेर येताना पत्रकारांनी त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार केला होता. सर्वांच्यांकडे पाहत तो एकच वाक्य बोलून गेला की, ” या मारुती मानेंना आमच्या युरोपात पाठवा, माझ्या आयुष्यात यांच्यासारखा शक्तिशाली पैलवान मी पाहिला नाही….खरोखर मी त्यांना सलाम करतो”प्रतिस्पर्धी कितीही मोठा असला तरी त्याला न डगमगता कुस्ती करण्याची धाडसी शैली भाऊच्याकडे होती. या लढतीमुले जागतिक कुस्ती क्षेत्रात पै. मारुती भाऊ मानेच्या नावांचा प्रचंड दबदबा निर्माण झाला. १९६९ मधील आशियाई क्रीडा स्पर्धेत एडिंबर्ग (स्कॉटलंड) येथे रौप्यपदक पठकवले. असे एकापाठोपाठ एक मानाचे तुरे आपल्या माध्यमातून देशाच्या शिरपेचात खोवताना पै. मारुती भाऊ माने यांनी कधीही आपले लाल मातीचे नाते तोडले नाही.

१९७० साली “कुस्तीपंढरी” म्हणून ओळखल्या जाणार्‍या कोल्हापुरातील खासबाग मैदानावर पाकिस्तानचा शेर म्हणुन ओळखल्या जाण्यार्या सादिक पंजाबी यांच्यावर विजय मिळवून पै. मारुती भाऊ माने उभ्या महाराष्ट्रातील जनतेच्या गळ्यातील ताईत बनले. पाकिस्तानचा दिग्गज पैलवान सादिक पंजाबी हा त्याच्या खेळाने कुस्ती रसिकांचा लाडका होता. पाकिस्तानचा अपराजित मल्ल अशी त्याची ख्याती होती.गोरापान पिळदार शरीरयष्टीचा सादिक पंजाबी. कुस्तीतील जादुगार होता. कुस्ती खेळताना चित्रविचित्र उड्या मारून प्रतिस्पर्ध्याला धाक बसवत असे. अनेक दिग्गज अश्या पैलवानाना चीत करुन सादिक पंजाबीने सार्या महाराष्ट्राला आव्हान दिले होते. कोल्हापुरातील खासबाग मैदानात या सादिकच्या छाताडावर बसून त्याची नशा भाऊंनी उतरविली. सादिकचा अपराजित मल्ल असा उल्लेख जो होत होता त्याला तडा देण्याचे काम पै. मारुती भाऊ माने यांनी केले. सादिक पंजाबी सारख्या पाकिस्तानी मल्लाला चारीमुंड्या चीत केल्याने त्यांच्या कीर्तीची पताका आणखी डौलाने फडकू लागली होती. पै. मारुती भाऊ माने यांनी केवळ महाराष्ट्रात नव्हे, तर देशपातळीवर एक धाडसी मल्ल म्हणून नावलौकिक मिळविला होता. यशाच्या अत्युच्च शिखरावर पै. मारुती भाऊ माने यांनी कुस्ती क्षेत्राचा विनम्रपणे निरोप घेतला आणि पुढचे सारे आयुष्य त्यांनी कुस्ती क्षेत्राचा विकास आणि तरुण मल्लांच्या समस्या सोडवण्यासाठी घालवले.
पै. मारुती भाऊ माने या नांवाभोवती एक वैभवी वलय होते. भाऊंचा उमेदीचा काळ हे कुस्तीचे सुवर्णयुग होते. त्याकाळात कुस्तीला प्रतिष्ठा होती व मल्लांना ग्लॅमर होते. पै. मारुती भाऊ माने यांच्या कुस्तीचा सुवर्णकाळ म्हणजे १९६२ ते १९७२ हे दशक ओळखले जाते. भाऊंना पाहण्यासाठी खेडय़ापाडय़ामधून लहानांपासून मोठय़ांपर्यंत अनेक लोक सतत गर्दी करीत असत, असे रुबाबदार व्यक्तिमत्त्व त्यांना लाभले होते. भाऊ ज्यावेळी लाल मातीच्या सर्वोच्च पदावर होते. त्यावेळी त्यांचे वजन १२५ किलोच्या आसपास होते. सहा फुट उंची, भारदस्त छाती, भीमकाय कमावलेली पिळदार शरीरयष्टी तसेच गोरीपान काया असे देखणे व्यक्तिमत्व मारुती माने यांना लाभले होते. कपाळावर दोन्ही भुवयांच्यामध्ये लावलेला शेंदूर त्यांच्याव्यक्तिमत्वात अधिकच भर घालत असे. तीन बटणांचा पांढरा शुभ्र सदरा, पांढरे शुभ्र धोतर, पायात कुरकुरणार्‍या कोल्हापुरी चपला, डोक्यावर तुर्रेबाज फेटा आणि एका हातात धोतराचा सोगा अशा ढंगात वावरणारे हे वज्रदेही व्यक्तिमत्व पाहून कोणाचीही त्यांना दृष्ट लागावी, अशी परिस्थिती होती. त्याकाळी तर त्यांचे व्यक्तिमत्व अधिक रुबाबदार दिसायचे. त्यांच्या कुस्तीतील डावपेचावर कुस्तीशौकीन फिदा असायचे. भाऊंना जी प्रसिध्दी आणि लोकमान्यता लाभली. ते भाग्य क्वचितच अन्य कोणा पैलवानाच्या वाट्याला आले असेल.

महाराष्ट्रातल्या लाल मातीचा त्यांना विलक्षण अभिमान होता. दिल्लीच्या पै. सतपाल यांनी कोल्हापूरच्या मैदानात पैलवान दादु चौगुलेंना हरवून महान भारत केसरीपदाचा सन्मान जिंकला आणि नव्यापद्धतीच्या कुस्तीचा डंका त्याचे गुरू हनुमान यांनी पिटला. पै. सतपाल समोर कुणीही मल्ल टिकत नसे, त्याचे कुस्तीकौशल्य अफाट आहे असा दबदबाही निर्माण झाला होता. तेव्हा, पै. मारुती भाऊ माने यांनीपै. हरिश्चंद्र बिराजदार यांना, मराठी मातीची आण घालत, प्रेरणा दिली. आपल्या देखरेखीखाली सरावही करायला लावला. तुम्ही कधीच हरणार नाही, असा आत्मविश्वासही निर्माण केला. पै. हरिश्चंद्र बिराजदारनी पै. सतपालच्या कुस्तीतल्या नव्या तंत्राचा फुगा फोडत त्याला पराभूत केले. आपल्या कुस्तीच्या जीवनातला हा ” सुवर्ण क्षण ” अशा शब्दात पै. मारुती भाऊ माने यांनी

पै. हरिश्चंद्र बिराजदारनी मिळवलेल्या विजयाचा आनंद व्यक्त केला होता.
दिल्ली येथील क्रीडा नगरीच्या एका रस्त्याला “हिंदकेसरी मारूती माने पथ’ असे नामकरण केले आहे.

2004 मध्ये दलित मित्र आणि 2005 मध्ये क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट असा “ध्यानचंद खेलरत्न’ पुरस्कार त्यांच्याकडे चालून आला. कुस्ती क्षेत्रातील देदीप्यमान यशाने हुरळून न जाता पै. मारुती भाऊ माने यांनी कवठे पिरान येथील स्वमालकीची पाच एकर जागा विद्यालयासाठी देऊन त्यावर 40 लाखांची अद्ययावत इमारत बांधून देत आपली सामाजिकतेची जाणीव कायम असल्याचा प्रत्यय दिला आहे. वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे 10 वर्षे संचालकपद आणि त्यापुढील पाच वर्षे उपाध्यक्षपद भूषविले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्षपद सलग पाच वर्षे सांभाळताना आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीची दखल ‘नाबार्ड’ ला घेण्यास भाग पाडून “एक आदर्श बॅंक” म्हणून बॅंकेला लौकिक प्राप्त करून दिला. जागतिक पातळीवरील व्यक्तींची नोंद आवर्जून घेणाऱ्या “हुज हू’ या

पुस्तकात हिंदकेसरी पै. मारूती माने या एकमेव भारतीय व्यक्तीची कुस्तीगीर म्हणून नोंद आहे.

O हिंदकेसरी मारुती भाऊ मानेंची संपूर्ण कारकीर्द O

O जीवनपट O●•••••••••••••●
नाव – मारुती ज्ञानू माने (पाटील)

पत्ता : मु. पो. कवठेपिरान ता. मिरज जि. सांगली.

जन्म- २७ डिसेंबर १९३८

शिक्षण – सातवी

मृत्यु – २७ जुलै २०१०

O कुस्ती क्षेत्रातील कामगिरी O
●•••••••••••••••••●
सुवर्णपदक- आशियाई क्रीडा स्पर्धा (जकार्ता) १९६२

रौप्यपदक- आशियाई क्रीडा स्पर्धा (जकार्ता) १९६२

रौप्यपदक- जागतिक स्तरावरील कुस्ती स्पर्धा (रशिया) १९६३

हिंदकेसरी- अखिल भारतीय कुस्ती स्पर्धा (पंजाब) १९६४

सुवर्णपदक- अखिल भारतीय कुस्ती स्पर्धा (दिल्ली) १९६४

सुवर्णपदक- अखिल भारतीय स्पर्धा (ओरिसा) १९६५

रौप्यपदक- विरुद्ध पै. अलेक्‍झांडर मिद्विद्‌ (रशिया) १९६७

रौप्यपदक- आशियाई क्रीडा स्पर्धा (स्कॉटलॅंड) १९६९

O गाजलेल्या कुस्त्या O
●•••••••••••••●
विजेतेपद- विरुद्ध पै. भीमसेन सेनादल (दिल्ली) १९६४

विजेतेपद- विरुद्ध पै. महम्मद हनिफ (कोल्हापूर) १९६४

विजेतेपद- विरुद्ध पै. विष्णूपंत सावर्डेकर (कोल्हापूर) १९६५

विजेतेपद- विरुद्ध पै. चंदगीराम हरियाना (बेळगांव) १९६६

विजेतेपद- विरुद्ध पै. सादिक पंजाबी (कोल्हापूर) १९७०

विजेतेपद- विरुद्ध पै. दत्ता सिंग (कोल्हापूर) १९७२

O क्रीडा क्षेत्रातील योगदान O
●••••••••••••••••●
अध्यक्ष – अखिल भारतीय कुस्ती निवड समिती – २ वर्षे
अध्यक्ष- महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद (सन १९८१ – १९८५)
सदस्य – अखिल भारतीय कुस्तीगीर परिषद (सन १९८१ पासून)
महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषद (सन १९९२-१९९५)
उपाध्यक्ष – अखिल भारतीय माजी मल्ल संघटना ( १९९२ पासून)
पुणे (बालेवाडी) क्रीडा संकुलामध्ये उच्च्स्तरीय समितीत सदस्य
O सन्मान O
●••••••●
शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार – महाराष्ट्र शासनातर्फे सन १९८१ मध्ये शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित.

दिल्लीत क्रिडानगरी रस्त्यास हिंदकेसरी मारुती माने पथ नामकरण

” हुज हु ” या पुस्तकात जगातील सर्वश्रेष्ठ मल्लांच्या यादीत समावेश

दलित मित्र पुरस्कार – सन २००३ – २००४

ध्यानचंद पुरस्कार – २००५

O सामाजिक, सहकार व राजकीय क्षेत्रातील योगदान O

●•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••●

सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य – १९६७ – १९७०

कवठेपिरान ग्रामपंचायतीचे सरपंच – २५ वर्षे (सन १९७३ ते १९९८)

गावातील सोसायटी, संस्था व ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा

वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक (सन १९७० ते १९८०)

वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष (सन १९८० ते १९८५)

खासदार (राज्यसभा) १९८५ – १९८७

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष (सन १९९१ -१९९६)

सांगली जिल्हा बँकेला आदर्श दर्जा मिळवून देण्यात मोलाची कामगिरी.

O शिक्षण क्षेत्रातील कामगिरी O

●••••••••••••••••••●

हिंदकेसरी मारुती माने विद्यालयाची स्थापना केली व विद्यालयाला स्वत:च्या पाच एकर जागेत ४० लाखांची इमारत बांधुन दिली. सप्तर्षी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करुन गर्ल्स हायस्कुल सुरु केले.

सध्या मॅटवरील कुस्तीच्या युगात प्रकर्षाने आठवण येते ती तांबड्या मातीवरील कुस्तीचा अनभिक्त सम्राट म्हणून ओळखले जाणारे हिंदकेसरी मारुती भाऊ माने यांची. एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन स्वकर्तृत्वावर हिंदकेसरी, जकार्तावीर, खासदार असा प्रवास केला. आज भाऊ आपल्यात नाहीत, पण त्यांच्याकर्तृत्वाचा स्मृतिगंध नेहमीच भावी कुस्ती क्षेत्राला सतत प्रेरणा देत राहील, यात शंका नाही.
……..पुन्हा असा पैलवान होणे नाही!
भाऊंच्या पवित्र स्मृतीस कुस्ती मल्लविद्या परिवाराचा मानाचा मुजरा…!

धन्यवाद
लेखन,शब्दांकन,संकल्पना
श्री.विलास किसन गोसावी
संघटक
कुस्ती मल्लविद्या महासंघ
महाराष्ट्र राज्य.
http://www.facebook.com/kustimallavidya

(लेखकाच्या नावसाहित फॉरवर्ड
करणे आवश्यक)

धन्यवाद
पै.गणेश मानुगडे
कुस्ती-मल्लविद्या महासंघ

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close