महाराष्ट्रसांगली

बार्टी समतांदूतांमार्फत 59 अनुसूचित जातीचे गावनिहाय सर्वेक्षण : जिल्हा प्रकल्प अधिकारी गणेश सवाखंडे

सांगली, दि. 24 : महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंढे, बार्टीचे महासंचालक कैलास कणसे, बार्टीच्या मुख्य प्रकल्प संचालिका प्रज्ञा वाघमारे व जिल्हा प्रकल्प अधिकारी गणेश सवाखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली 59 अनुसूचित जाती नामशेष होणाऱ्या जातींना इतर जातीच्या प्रवाहात येण्यासाठी सांगली जिल्ह्यात काम चालू आहे. सांगली जिल्ह्यातील 7 समतांदूतामार्फत गावनिहाय 59 अनुसूचित जातीचे सर्वेक्षण करण्यात येत असून आत्तापर्यंत सांगली जिल्ह्यातील 416 ग्रामपंचायतींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. अशी माहिती बार्टीचे जिल्हा प्रकल्प अधिकारी गणेश सवाखंडे यांनी दिली.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्यावतीने सांगली जिल्ह्यातील तालुक्यात कार्यरत असलेल्या समतांदूतांच्याकडून तालुक्यातील गटविकास अधिकारी व गावातील ग्रामसेवकांच्या सहकार्याने 59 अनुसूचित जातीच्या विकासासाठी अधिक प्रभावी योजना व उपक्रम राबविण्यासाठी गावनिहाय 59 अनुसूचित जातीचा सर्वेक्षण करून शासनास अहवाल सादर करण्यात येणार आहे. बार्टी, पुणे या स्वायत्त संस्थेच्या वतीने अनुसूचित जातीच्या विकासासाठी व उत्थानासाठी कार्य केले जाते. त्यानुसार महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जाती मधील समाविष्ट 59 जातींपैकी महार, मांग, चांभार, मेहतर, वाल्मिकी, ढोर, अशा मोजक्याच जातीबाबत समाजात माहिती असते. परंतु या जाती व्यतिरिक्त 59 जातींतील काही जाती महाराष्ट्र राज्यातून नामशेष होताना दिसून येत आहे. म्हणून आशा जातीचा शोध घेऊन त्याची सध्यपरिस्थिती जाणून घेऊन संशोधन अहवाल शासनास सादर करण्यात येणार आहे. जेणेकरून या इतर जाती देखील विकासाच्या प्रवाहात येतील. या सर्वेक्षणासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी,ग्रामविस्तार अधिकारी व ग्रामसेवक यांचे सहकार्य लाभले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे काही ठिकाणी अडचणी येत आहेत. परंतु आरोग्याची काळजी घेऊन व सुरक्षित अंतर ठेवून मास्कचा व सॅनिटायझरचा वापर करून समतादूत अंकुश चव्हाण, सागर आढाव, आबासाहेब भोसले, विक्रांत शिंदे, सविता पाटील, लता सुरवसे, शहाजी पाटील विशेष परिश्रम घेत असल्याचे श्री. सवाखंडे यांनी सांगितले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close