महाराष्ट्र

लॉकडाऊन काळात प्रशासन व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने दोन लाख गरजूंना धान्य किटचे वाटप : पालकमंत्री डॉ. नितीन राऊत

नागपूर : ‘लॉकडाऊन’च्या काळात जिल्हा प्रशासन, स्वयंसेवी संस्था व समाजातील दानशुरांनी कौतुकास्पद कार्य केले असून २ लाख ८ हजार ४२४ गोरगरीब व गरजू व्यकींना धान्य किटचे वाटप करून संकटकाळात माणुसकीचा आदर्श निर्माण केल्याचे गौरवोद् गार पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी काढले.
कोविड-१९ सहायता निधीमध्ये योगदान दिलेल्या स्वयंसेवी संस्था व व्यक्तींना प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, अपर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, उपजिल्हाधिकारी आशा पठाण, रेड क्रॉस सोसायटीचे डॉ. मनोहर बुद्धेश्वर, सत्यनारायण नवाल व लीना बुधे यावेळी उपस्थित होते.
‘लॉकडाऊन’च्या काळात गरजूंना धान्य किट देण्याबाबत आपण प्रशासनाला सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने शासन निर्णयातील निकष बदलण्यासाठी पाठपुरावा करून सुधारित शासन निर्णय सुद्धा काढण्यात आला. धान्य किट पुरविण्यासाठी स्वयंसेवी संस्था व समाजातील दानशूर व्यकींनी सहकार्य करण्याच्या प्रशासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देणाऱ्या संस्थेचे याकामी मोलाचे योगदान लाभले, असे पालकमंत्री म्हणाले.
कोविड विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खनिज विकास निधीमधून ९८ कोटी रुपयांचा निधी इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास देण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या निधीमधून वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यात आले. अशा स्वरूपाचा निधी देणारा नागपूर हा पहिला जिल्हा होता, असे पालकमंत्री म्हणाले.
सर्वत्र टाळेबंदी असल्यामुळे २ लाख ८ हजार ४२४ गरजू व्यक्तींना धान्य किट वाटप करण्यात आले. यासाठी ११ कोटी ४९ लाख रुपयांना निधी उभारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे शिधापत्रिका नव्हती अशा २१ हजार कुटुंबांना देखील धान्य किट वाटप केल्याचे त्यांनी सांगितले. या संकटकाळात प्रशासनाच्या मदतीला धावून येणाऱ्या स्वयंसेवी संस्थाचे मानावे तेवढे आभार कमीच असल्याचे पालकमंत्री म्हणाले. अजूनही संकट टळले नसून नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले.
जिल्हाधिकारी ठाकरे
आपत्तीच्या काळात अनेकांनी प्रशासनास मोठ्या मनाने सहकार्य केले असून प्रत्येक गरजूपर्यंत धान्य किट पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याचे जिल्हाधिकारी श्री. ठाकरे यांनी सांगितले. यासाठी स्वयंसेवी संस्था स्वयंस्फूर्तीने पुढे आल्याचे त्यांनी नमूद केले. भविष्यात अशा संकटाचा सामना करण्यासाठी ‘पालकमंत्री सहायता निधी’ उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी स्वयंसेवी संस्था व दानशूर देणारे व्यक्ती यांचा प्रमाणपत्र देऊन पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्र संचलन सवाई यांनी केले.
ओआरटी बार असोशिएशन नागपूर, गुड इरेथाग्रोयी प्रा. लि., बीएसएस माईन्स मिनरल प्रा.लि., नाईकी स्पोर्टस, सिम्लेक्स केमोपार्क, एलआयसी परिवार नागपूर, स्पेसवुड फर्निचर नागपूर, नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, मेकगेल प्रा.लि., व्हिएनआयटी नागपूर, जेएसडब्ल्यू फाउंडेशन, सोलर इंडस्ट्रिज, रेडक्रॉस सोसायटी नागपूर यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
नागपूर शहरात व जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यामध्ये विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे व जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी कौतुकास्पद काम केल्याचे पालकमंत्री म्हणाले. नागपूर शहरात तुकाराम मुंढे व नागपूर जिल्ह्यात रवींद्र ठाकरे यांनी शिस्त लावल्यामुळे कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात राहला. त्यामुळे सर्व अधिकारी शाबासकीस पात्र आहेत अशा शब्दात पालकमंत्र्यांनी प्रशासनाचे कौतुक केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close