विचारपुष्प

बलाढ्य_धनाढ्य_असलात_तरी..!

तुम्ही
पुस्तकं चोरायला घुसला असता
तर
विचारांचा पुष्पहार घालून
सोडलं असतं
उघडपणे…!

तिथल्या
विचारस्पर्शित भिंतींना
कवटाळायला चुंबायला हवं होतं
मेंदूतल्या धर्मांध चेहऱ्यावरचं
काढून अंधश्रद्धाळु मास्क..!

रक्तरंजित अशुद्ध विचारांचं
शुद्धीकरण झालं असतं
नुसत्या सहवासाने..!

दगड उचलण्या ऐवजी
उचलायला हवे होते विचार
शरीरातल्या प्रत्येक
तंतुमय रेषेने..!

पुस्तकांच्या काचा
फुटत नसतात कधी
दगडी प्रवृत्तीच्या
निर्जीव दगडांनी
त्यांना असतं कवच
समतेचं बधुंतेचं आणि सम्यकतेचं..!

तुमच्या पैदासी आधीच्या
जिवंत ज्वलंत माणुसकीचे
संदर्भ आहेत
तिथं खेळणाऱ्या
मानवतावादी मुक्त हवेत..!

शाब्दिक संस्करांनी
प्रेरित असलेली
झाडं पुन्हा बहरतील
फुटल्या समग्री नव्याने करतील
डागडुजी विचारांची
पण,
तुमचं काय…?

कर्मठ दलदलीच्या तळाशी
फसवून हात वर केलेत
रोगट चिखलात ढकलणाऱ्यांनी…!

पुस्तकं समानतेची आहेत
विषमवतेवर प्रहार करणारी
समानतेचा हिसका
चुकणार नाही
कितीही
बलाढ्य.. धनाढ्य.. असलात तरी..!

— हृदयमानव अशोक
9921083640

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close