महाराष्ट्रसांगली

सांगलीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिस दलातील कोविड योध्‌यांचा सत्कार

पालकमंत्री जयंत पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले कौतुक

सांगली : गत तीन महिन्यापासून पोलीस विभाग, आरोग्य विभाग, संपूर्ण प्रशासन अविरत कार्यरत आहेत. कोरोनाच्या महामारीत संक्रमण रोखण्यासाठी काम करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन करून अनलॉक काळात संक्रमणाचा धोका अधिक तीव्र होणार आहे. त्यामुळे गाफील राहू नका. संक्रमण वाढू नये यासाठी अधिक सतर्क रहा, असे प्रतिपादन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले.
कृष्णा मॅरेज हॉल सांगली येथे महाराष्ट्र पोलीस कोविड-१९ अनुषंगाने सांगली जिल्हा पोलीस दल अधिकारी, कर्मचारी संवाद व सत्कार कार्यक्रमात आपत्ती काळात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कोविड योध्‌यांचा सत्कार गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याहस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जलसंपदा आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीपसिंह गिल व अशोक वीरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
लॉकडाऊन काळ संपून अनलॉकचा काळ सुरू झाला आहे. परगावी, परराज्यात गेलेले श्रमिक, मजूर उद्योगधंदे सुरू होऊ लागल्याने पुन्हा येत आहेत. त्यामुळे यंत्रणेवर ताण येणार आहे. त्यासाठी जिल्ह्याची यंत्रणा सज्ज ठेवा, असे सांगून गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, कोविडच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाने केलेल्या विविधांगी कामामुळे पोलीसांची प्रतिमा सर्वाधिक उंचावली आहे. या काळात अनेक कर्मचारीही राज्यभरात कोरोना बाधीत झाले आहेत. त्यांना चांगल्या उपचाराच्या सुविधा निर्माण करण्यात आल्या असून एखाद्या कर्मचाऱ्याचा यामध्ये दुर्देवी मृत्यू झाल्यास त्यांच्या परिवाराला ६५ लाख रूपयांचे आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तसेच कर्तव्य बजावत असताना पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या सेवानिवृत्तीच्या दिनाकांपर्यंत त्यांचे कुटुंबिय शासकीय निवासस्थानामध्ये राहू शकेल, असाही निर्णय घेण्यात आल्याचे सांगून कोरोना काळात चांगली सेवा बजावणाऱ्यांना आपत्ती सेवा पदक देण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा प्रातिनिधीक सत्कार पालकमंत्री जयंत पाटील व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जिल्हा पोलीस दलाने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याहस्ते सत्कार होत असल्याबद्दल मनस्वी आनंद होत आहे. पोलीस दल सक्षम करण्याचे, पोलीस दलात सरकार तुमच्या पाठीशी आहे असा विश्वास निर्माण करण्याचे काम गृहमंत्री अनिल देशमुख करत आहेत, याबद्दल त्यांनी प्रशंसा केली.
पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा म्हणाले, स्वत:ची व स्वत:च्या कुटुंबाची पर्वा न करता सांगली जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी आपत्तीच्या काळात रात्रंदिवस तैनात आहेत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, कंटेनमेंट झोनची अंमलबजावणी, अत्यावश्यक सेवांचा पुरवठा यामध्ये महत्वपूर्ण योगदान जिल्हा पोलीस दलाने दिले आहे. गृह मंत्रालयाकडून मास्क, सॅनिटायझर, संरक्षक सामग्रीचा पुरवठा जिल्ह्याला झाल्याबद्दल आभारही व्यक्त केले.
यावेळी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करणारे डॉक्टर्स तसेच कोविड काळात पोलीसांना मदत करणाऱ्या विशेष पोलीस अधिकाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात शहीद जवान यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. आभार अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले यांनी मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close