शेजारील जिल्ह्यात काम करणाऱ्या कामगारांना ये-जा करण्यास पास देण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्राधिकृत
सांगली : राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून राज्य शासनाकडून विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यत येत आहेत. लॉकडाऊनचा कालावधी 30 जून 2020 पर्यंत वाढविण्यात आला आहे. परंतु लॉकडाऊन वाढवीत असताना शासनाने राज्याची आर्थिक बाजू सक्षम होण्याच्या दृष्टीने उद्योग घटकांना परवानगी दिली आहे. सांगली जिल्ह्यात रहिवासी असलेले कामगार जे सांगली जिल्हा हद्दीला लागून असणाऱ्या जिल्ह्यातील उद्योग घटकांमध्ये कामास आहेत अशा कामगारांना सदर उद्योग घटकांमध्ये ये-जा करण्यासाठी दैनंदिन पास देणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक नितीन कोळेकर यांना जिल्ह्यात रहिवासी असलेले कामगार, जे सांगली जिल्हा स्थलसीमा हद्दीला लागून असणाऱ्या जिल्ह्यातील उद्योग घटकांमध्ये कामास आहेत, अशा कामगारांना सदर उद्योग घटकांमध्ये ये-जा करण्यास दैनंदिन पास देण्यासाठी प्राधिकृत केले आहे.